Supriya Sule : मोहित कंबोज यांच्या ट्विटची अमित शाह यांनी चौकशी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी; भाजपालाही लगावला टोला
सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा विषय आता संपला आहे. पुन्हा का हा विषय काढला जात आहे, याचे उत्तर मी देऊ शकत नाही. मात्र ज्यांनी हा विषय काढला, त्यांनाच याविषयी अधिक विचारले पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुणे : मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या ट्विटची अमित शाह यांनी चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. त्या पुण्यातील पौड येथे बोलत होत्या. मोहित कंबोज यांनी आज एकामागून एक ट्विट करत राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार, घोटाळ्याच्या आरोपात जेलवारी होणार अशा आशयाचे ट्विट केले आहे. त्यामुळे आता यावर चर्चा सुरू झाली आहे. यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली आहे. सुरुवातीला तर त्यांना देश सोशल मीडियावर चालत नाही, असा टोला मोहित कंबोज यांना लगावला आहे. देश सोशल मीडियावरून चालत नाही, सभागृहात चालतो. ईडीसारख्या (Enforcement Directorate) यंत्रणा स्वायत्त आहेत. मग असे असताना माहिती बाहेर जाते कशी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
‘सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा विषय संपला’
सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा विषय आता संपला आहे. पुन्हा का हा विषय काढला जात आहे, याचे उत्तर मी देऊ शकत नाही. मात्र ज्यांनी हा विषय काढला, त्यांनाच याविषयी अधिक विचारले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. पंतप्रधानांना आम्हाला काही सांगायचे असते, त्यावेळी आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करतो. विधानभवन किंवा संसद याठिकाणी आपले मत मांडता येवू शकते. सोशल मीडियावर, ट्विटवर प्रश्न मांडले तर संसद, विधीमंडळाचे महत्त्व काय? देश ट्विटरवच चालणार का, असा सवाल त्यांनी केला.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
‘ये तो होना ही था’
निधी वाटपावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला टोला लगावला आहे. यात मला काही आश्चर्य वाटत नाही, यह तो होना ही था, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच निधी वाटपावरून शिंदे गट फुटला तर राष्ट्रवादीवर दबाव आणून अजित पवार यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या अंदाजावर त्या म्हणाल्या, की देशासमोर सध्या जीएसटी, महागाई तर राज्यात पूरपरिस्थिती आहे. अनेक ठिकाणी खूप अडचणीत लोक आहेत. त्यावर काम करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आमचे हे काम आहे, असे त्या म्हणाल्या.