Anand Dave : आंबिल ओढ्याची भिंत बांधला आली नाही 5 वर्षात आणि रोप वे बांधणार, बसेस उडवणार; गडकरींच्या घोषणेची दवेंनी उडवली खिल्ली
या केवळ घोषणाच राहणार असल्याचे म्हणत आनंद दवे यांनी नितीन गडकरींचा (Nitin Gadkari) समाचार घेतला. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, असे म्हणत केवळ निवडणुका आल्या की पतंगबाजी यांना सुचते अशी टीका त्यांनी यावेळी केली.
पुणे : पुण्याच्या दोन महानगरपालिका होणार नाहीत, स्काय बस होणार नाही, पर्वतीचा रोप वेदेखील होणार नाही. हे सगळे फेक आहे. एवढ्या वर्षात का दुसऱ्या महानगरपालिकेसाठी नाही अभ्यास केला, असा सवाल करत हिंदू महासंघाने (Hindu Mahasangh) नितीन गडकरी यांच्यावर टीका केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काल पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुण्यातील वाहतूककोंडी, चांदणी चौक परिसरातील वाहतुकीची समस्या, महानगरपालिका, रोप वे, स्काय बस यासह विविध घोषणा आणि पाहणी केली. यावर अखिल भारतीय हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी टीका केली आहे. यातील काहीही होणार नाही. या केवळ घोषणाच राहणार असल्याचे म्हणत आनंद दवे यांनी नितीन गडकरींचा (Nitin Gadkari) समाचार घेतला. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, असे म्हणत केवळ निवडणुका आल्या की पतंगबाजी यांना सुचते अशी टीका त्यांनी यावेळी केली.
‘आधी सुविधा वेळेवर द्या’
मागच्या 5 वर्षात रोपवेचे डिझाइन, त्याचे बजेट झाले का तयार? असा सवाल त्यांनी केला. यांना आंबिल ओढ्याची भिंत नाही बांधता आली 5 वर्षात आणि रोप वे बांधणार, बसेस उडवणार, अशी खिल्ली आनंद दवे यांनी नितीन गडकरी यांची उडवली. ते म्हणाले की, उडती बस नंतर, पण आधी वेळेवर पुणेकरांना पीएमपी द्या, व्यवस्थित पाणी द्या, चांगले रस्ते द्या, अशी टीका आनंद दवे यांनी नितीन गडकरी यांच्यावर केली आहे.
काय म्हणाले नितीन गडकरी?
पुण्यात वाहतूककोंडीची मोठी समस्या आहे. त्यामुळे त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न होत आहे. नितीन गडकरी यांनीही यावर उपाय सुचवला आहे. उडत्या बसेसची योजना पुण्यात आणली, तर वाहतुकीची समस्या कमी होण्यास फायदा होईल, असे नितीन गडकरी म्हणाले होते. चांदणी चौकातील वाहतूक समस्या आणि इतर मुद्द्यांवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी चार मजली रस्त्यांची योजनाही राबविण्याचा विचार गडकरींनी बोलून दाखवला आहे. याची आता विरोधक खिल्ली उडवायला लागले आहेत.