Anand Dave : ‘…तर मग शरद पवारांनी शिवचरित्र लिहून न्याय द्यावा, आम्ही प्रकाशन करू’; आनंद दवेंचा पवारांना टोला
गेल्या काही काळात अनेकांनी शिवचरित्र लिहिली, काहींनी त्यात वस्तुस्थिती मांडली, मात्र काहींनी धादांत खोटी माहिती लिहिली. काही घटकांनी शिवछत्रपती यांचे चरित्र लिहिताना धर्मांधता कशी वाढेल, याचाच विचार केला, अशी टीका शरद पवार यांनी केली होती.
पुणे : बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांनी शिवाजी महाराजांवर अन्याय केला, हे पवार यांचे वक्तव्य केवळ चुकीचे नसून निंदनीय आहे, अशी टीका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. शिवाजी महाराज आणि शिवचरित्रावर बाबासाहेब पुरंदरे यांच्याइतका अन्याय इतर कोणीही केला नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यात केले होते. त्यावर आनंद दवे यांनी टीका केली आहे. एवढेच नाही, तर शरद पवारांनी शिवचरित्र लिहून महाराजांना न्याय द्यावा, असा उपरोधिक टोलाही लगावला आहे. ब्राह्मण समाजासोबत शरद पवारांनी एक बैठक मागे बोलावली होती. यावेळी आम्ही पवारांची भेट नाकारली हेच बरोबर होते, हे आज पुन्हा सिद्ध झाले, असाही टोला आनंद दले यांनी शरद पवार यांना लगावला आहे.
‘त्याचे प्रकाशन आम्ही करू’
आनंद दवे शरद पवारांवर टीका करताना म्हणाले, की बाबासाहेब पुरंदरे यांचा अभ्यास आणि मांडणी खोटी असेल तर आत्ता माननीय पवार साहेब यांनी शिवचरित्र लिहावे. त्यात महाराजांना ब्राह्मण शत्रू, सेक्यूलर, इस्लामचे प्रेमी, आरक्षणाचे समर्थक दाखवावे आणि महाराजांना न्याय द्यावा. माननीय पवार साहेबांनी त्यांना योग्य वाटेल असे शिवचरित्र लिहावे. त्याचे प्रकाशन आम्ही करू, असे दवे म्हणाले. तर पवार साहेब यांनी पुरंदरे यांचे कौतुक केलेला व्हिडिओ आमच्याकडे आहे. त्याबद्दल स्पष्टीकरण करून स्वतःचीच माफी मागावी, अशी मागणीदेखील दवे यांनी केली.
काय म्हणाले होते शरद पवार?
गेल्या काही काळात अनेकांनी शिवचरित्र लिहिली, काहींनी त्यात वस्तुस्थिती मांडली, मात्र काहींनी धादांत खोटी माहिती लिहिली. काही घटकांनी शिवछत्रपती यांचे चरित्र लिहिताना धर्मांधता कशी वाढेल, याचाच विचार केला. राज्यात काही पुस्तके ही खूप लोकप्रिय झाली. लोकांनी घराघरात ठेवली ती पुस्तक म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांची पुस्तके होय. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका अन्याय शिवचरित्रावर दुसरा कोणी केला नाही, असे शदर पवार म्हणाले होते. तसेच दादोजी कोंडदेव, समर्थ रामदास यांचे योगदान काय, याच्या खोलात जायचे नाही. पण राजमाता जिजाऊ याच शिवाजी महाराज यांच्या गुरू, मार्गदर्शक होत्या, असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले होते.