होय, मी शुद्र…अरे वारे वा चोंग्यांनो, आम्ही शुद्र ना? मग कशाला आमच्यात येता?; छगन भुजबळ यांचा सवाल
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची तोफ पुन्हा एकदा धडाधडली. छगन भुजबळ यांनी इंदापूरच्या ओबीसी एल्गार परिषदेतून मनोज जरांगे पाटील यांच्यावर तोफच डागली. आम्हाला गावबंदी करण्यात आली आहे. आम्हाला गावात येऊ दिलं जात नाही. पण एकाच पक्षाला या गावबंदीतून वगळण्यात आलं आहे. ही अशी कशी गावबंदी? एकाच पक्षाला या गावबंदीतून का वगळलं? असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.
इंदापूर | 9 डिसेंबर 2023 : नाशिकच्या येवल्यात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी अवकाळी पावसाची पाहणी केली होती. त्यावेळी काही लोकांनी छगन भुजबळ यांचा ताफा ज्या ठिकाणाहून गेला तिथला रस्ता गोमूत्र शिंपडून पवित्र केला होता. त्यावरून छगन भुजबळ यांनी जोरदार हल्ला चढवला. तुम्ही रस्त्यावर गोमूत्र शिंपडलं. मी शुद्र म्हणून गोमूत्र शिंपडलं ना? होय, मी शुद्र आहे. मी दलित, बौद्ध आणि मराठ्यांच्या वस्तीत वाढलो. आम्ही शुद्र आहोत ना. मग कशाला आमच्या आरक्षणात येता? असा संतप्त सवाल छगन भुजबळ याांनी केला. इंदापुरात ओबीसी एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.
होय मी शुद्र आहे. माझं लहानपणापासूनचं आयुष्य दलित, बौद्ध, मराठा, लिंगायत आणि यूपीच्या भय्यांसोबत गेलं. मी दलितांसोबत वाढलो. मी आहेच शुद्र. आम्ही ओबीसी शुद्र आहोत. तुम्ही गोमूत्र शिंपडता. आणि मग तुम्ही आमच्याबरोबर शुद्र होण्यासाठी कुणबी सर्टिफिकेट मागता आणि आमरण उपोषण करता? अरे वारे वा चोंग्यांनों. आम्ही शुद्र नाय़ मग कशाला आमच्यात येता. तुम्ही उच्च तर उच्च. राहा तिकडे उंचीवर. रस्ते मीच बनवले. झाडू ते मारत आहेत. त्याला काय करायचं?, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.
एका पक्षाला गावबंदी का नाही?
यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्या गावबंदीच्या मुद्द्यावरही जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी एका गावातील माहितीच दिली. या गावात गावबंदीचा एका बाजूला बोर्ड लावलाय. तर दुसऱ्या बाजूला रोहित पवार यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. त्यांच्या सभाही गावात होतात. फक्त आम्हालाच गावबंदी आहे. सर्वांना गावबंदी. एकाच पक्षाला गावबंदी नाही. एकाच पक्षाच्या नेत्याला गावबंदी नाही. आम्हाला गावबंदी. ही सिलेक्टीव्ह गावबंदी आहे. पोलिसांना सांगतो, हे बोर्ड काढा. गावबंदी केली तर शिक्षेची तरतूद आहे, असं भुजबळ म्हणाले. सर्वांच्या संयमाला मर्यादा असतात. संयम संपला तर क्रोधाला आवर घालता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी, सरकारने या प्रकाराला वेळीच आवर घातला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.
तर सहानुभूती मिळाली नसती
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तर दिलं. अंतरवलीत जमाव हिंसक झाला, 79 पोलीस अधिकारी जखमी झाले. अंमलदार. पोलिसांनी बचावात्मक पद्धतीने वाजवी बळाचा वापर केल्याने 50 आंदोलक जखमी झाले. ही बाजू त्यावेळीच पुढे यायला हवी होती. त्याला सहानुभूती मिळाली नसती. शेवटी विधानसभेत सर्व आलं, असं भुजबळ म्हणाले.