अभिजित पोते, पुणे | 26 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात सर्वाधिक वाहने आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांची जबाबदारी मोठी असते. वाहतूक ठप्प आणि कोंडी होण्याचे प्रकार सतत होत असतात. यामुळे वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करत आहेत की नाही? हे सर्व पाहण्याचे काम वाहतूक पोलीस करत असतात. वाहतुकीचे नियम मोडल्यावर कारवाई केली जाते. पुणे येथील वाहतूक पोलिसाने ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या एका जवानास रोखले आणि त्याला मेमो दिला. त्यानंतर त्या जवानाचा राग अनावर झाला. त्याने त्या पोलिसावर हल्ला केला. त्याची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी त्या जवानास अटक करण्यात आली आहे.
पुणे शहरातील वाहतूक पोलीस रमेश डावरे यांनी दीड महिन्यापूर्वी ट्रिपल सीट जाणाऱ्या जवानास रोखले होते. ते वाहन जोधपूर येथील लष्करी तळावर कार्यरत असलेला जवान वैभव संभाजी मनगुटे चालवत होता. वाहतूक पोलीस रमेश डावरे यांनी त्या तिघांना रोखून मेमो दिला. आपणास मेमो दिलाचा राग वैभव मनगुटे यांना आला. त्यांनी चक्क वाहतूक पोलीस रमेश डावरे यांच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घातला.
ट्रिपल सीट जाताना अडवल्यामुळे वाहतूक पोलिसाला गंभीर मारहाण केली. यावेळी रमेश डावरे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैभव मनगुटे सुटीवर गावी आले होते. वैभव हे छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील रहिवाशी आहेत.
दीड महिन्यांपूर्वी ट्रिपल सीट जाताना अडवल्याने वाहन चालकाकडून सिमेंट ब्लॉकने रमेश डावरे यांच्यावर हल्ला झाला होता. फरासखाना पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या रमेश डावरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात वैभव मनगुटे यांना बुधवारी 25 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम 307, 332, 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.