मावळ (पुणे) : मावळमधील (Maval) एकवीरा देवी (Ekvira devi temple) यात्रा उत्सव काळात तीन दिवस गड परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. एकवीरा गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी (Crowd) होईल म्हणून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 लागू केले आहे. मात्र त्यांच्या अजब आदेशाने भाविक संभ्रमात तर दुसरीकडे कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले असताना हा आदेश काढल्याने भाविकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कार्ला वाकसई, वरसोली, मळवली, वेहरगाव येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून या भागात भारतीय दंड विधान कलम 144 लागू केले आहे. यात शोभेची दारू, फटाके गडावर नेणे, मुक्या प्राण्यांची हत्या करणे आणि दारूबंदी आदेश परिसरात यात्रा काळात लागू करण्यात आले आहेत.
अशाप्रकारचा आदेश काढण्यामागे काही गंभीर बाबींचा उल्लेख जिल्हाधिकारी देशमुख यांनी केला आहे. यात्रा काळात काहीजण मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन करत असतात. त्यातून भांडण, तंटा, वाद होत असतात. गडावर भाविक ढोल, ताशे, स्पीकर अन्य वाद्ये तसेच ग्रुप एकसारखे टीशर्ट घालून येत असतात. त्यात गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली यात्रा सुरू होत असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी कलम 144 लागू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाने भाविकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे कोरोनाचे निर्बंध राज्य सरकारने हटवले आहेत. उत्सव मोकळेपणाने साजरा करण्याची मुभाही देण्यात आली आहे. अशात या आदेशाने नेमके काय करावे, हे भाविकांना कळेनासे झाले आहे.