दिवंगत आमदाराच्या पत्नीचं दिराला प्रतिआव्हान; म्हणाल्या, त्यांची राजकीय उत्तराधिकारी मीच…
Ashwini Laxman Jagtap on Shankar Jagtap Statement : पिंपरी - चिंचवडच्या भाजपच्या आमदार अश्विनी जगताप यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांचे दीर शंकर जगताप यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. अश्विनी जगताप यांनी काय म्हटलं? त्यांची प्रतिक्रिया काय? वाचा सविस्तर...
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप या पिंपरी- चिंचवडच्या आमदार झाल्या. आता काहीच दिवसात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लागेल. या ठिकाणाहून लढण्याची इच्छा लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी व्यक्त केली आहे. यावर अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मी सुद्धा चिंचवड विधानसभेसाठी इच्छुक आहे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांची राजकीय उत्तराधिकारी मीच आहे. चिंचवड विधानसभा लढवण्यासाठी मी ठाम आहे. आमच्यात आगामी विधानसभेची चर्चा झाली नव्हती. भाऊ गेल्यानंतर चर्चा करायला वेळ मिळाला नाही. सर्व जण दुखत होते. चिंचवड मतदारसंघ हा भाजपचा आहे. महायुतीचा धर्म सर्वांनी पाळला पाहिजे, असं अश्विनी यांनी म्हटलं आहे.
पिंपरी- चिंचवड विधानसभा कोण लढवणार?
पिंपरी- चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा केला आहे. चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे या दोन जागांवरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. अशात पिंपरी-चिंचवडच्या जागेवर भाजपच्या आमदार अश्विनी जगताप यांच्या घरातच वाद असल्याचं समोर आलं आहे. अश्विनी जगताप यांचे दीर आणि पिंपरी चिंचवडचे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी या जागेवर दावा केला आहे.
लक्ष्मण जगताप यांचा दावा काय?
राष्ट्रवादीने जरी भोसरी आणि चिंचवड विधानसभा क्षेत्रावर दावा केला असला तरी या दोन्ही जागा भाजपकडेच आहेत आणि भाजपकडेच राहतील. सध्या ज्या जागांवर ज्या पक्षाचा आमदार आहे. त्या जागा महायुती त्याच पक्षाकडे असतील असा फॉर्मुला महायुती ठरला आहे. मी स्वतः चिंचवड विधानसभा क्षेत्रातून भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, अशी इच्छा शंकर जगताप यांनी व्यक्त केली आहे.
अजित पवार गटाने जरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा केला असला तरी महायुतीत जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय हा महायुतीतील वरिष्ठ पातळीवरील नेते घेतील, असंही शंकर जगताप यांनी म्हटलं आहे.