‘लोकांना कार चालवून घरी जावे लागते, पिण्याची मर्यादा ठरवा’, पुणे न्यायालयाचे बार-पब मालकांना निर्देश
Pune Porsche Accident Case : हिट अँड रनची घटना 19 मे रोजी पुण्यात घडली. कल्याणी नगर भागात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या 17 वर्षाच्या मुलाने स्पोर्ट कार पोर्शची दुचाकीस्वाराला धडक दिली. या घटनेच्या 15 तासांत काही अटी व शर्तींवर त्याला जामीन मिळाला.
महाराष्ट्रातील पुणे येथे पोर्श कार अपघात प्रकरणाने देश हादरला. ज्या पद्धतीने ही घटना घडली आणि नंतर अवघ्या काही तासांतच अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला, त्यावरुन देशभरात संतापाची लाट उसळली. पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासाने तर लोकांच्या मनातील शंकेला अजून बळ दिले. आता पुण्यातील स्थानिक न्यायालयाने याप्रकरणात निर्देश दिले आहे. पब आणि बार मालकांनी ग्राहकांना दारु सर्व्ह करण्याची, मद्य देण्याची मर्यादा निश्चित करावी, कारण लोकांना दारु पिल्यानंतर वाहन चालवत घरी पण जायचे असते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
तिघांना पोलीस कोठडी
- न्यायालयाने याप्रकरणात तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती केली होती. आरोपींचे वय लक्षात येऊनही आरोपी बार मालकाने अल्पवयीन आरोपी, त्याच्या मित्रांना दारु विक्री केल्याचे म्हणणे सरकारी पक्षाने मांडले.
- न्यायाधीशांनी अपघातात दोन तरुणांच्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त केली. आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोक्षे यांच्यासमोर सरकारी पक्ष आणि आरोपींच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. न्यायाधीश पोक्षे यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीने अधिक दारु पिली आहे, त्यांची पबमध्ये राहण्याची व्यवस्था व्हावी. रस्त्यावरील लोकांचा यात काय दोष? जे लोक पबमध्ये येतात. ते काही पायी घरी जात नाहीत. ते आपल्या वाहनातून घरी जातील. कुठे ना कुठे तरी बदल करावा लागेल. त्यामुळे पब आणि बार मालकांना त्यांना किती दारु द्यायची याची मर्यादा ठरवावी लागेल. न्यायालयाने बार आणि पब मालकांना लोकांना दारु सर्व्ह करण्याची मर्यादा ठरविण्यास सांगितल्याचे वृत्त आजतकने दिले आहे.
काय आहे प्रकरण
हे सुद्धा वाचा
- हिट अँड रनची ही घटना 19 मे रोजी घडली होती. कल्याणी नगरमध्ये हा अपघात घडला होता. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाने हा अपघात केला होता. महागड्या पोर्श कारने दुचाकीवरील दोघांना चिरडले होते. दोन्ही अभियंते होते. प्रकरणात अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी पिझ्झा आणि बर्गर आणून दिले होते. कोर्टाने काही अटी-शर्तीवर त्याची 15 तासांच्या आत जामीनावर सूटका केली होती.
- बाल न्याय मंडळाने आरोपीला 15 दिवसांपर्यंत ट्रॅफिक पोलिसांसोबत काम करण्याचे आणि रस्ते अपघातावरील प्रभावी तोडगा काय यावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितले होते. पोलीस तपासात आरोपी हा मद्याच्या अंमलाखाली होता आणि भरधाव कार चालवत असल्याचे निष्पन्न झाले होते.