अभिजीत पोते, पुणे : महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारण संपले आहे. आता फक्त सत्ता लोभी सत्ताकारण सुरू आहे. भारतीय जनता पार्टीने शिंदे गटाची फसवणूक केली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. राज्यात सुरू असलेल्या राजकारणावरून अतुल लोंढे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. तुम्हाला मंत्रिमंडळ विस्तारासाठी (Cabinet expansion) सतत दिल्लीला जावे लागते, यातच तुमचे अपयश दिसून येते. शिवसेना संपून आपल्याला सत्ता मिळवायची, ही भाजपाची संस्कृती असल्याचा आरोपदेखील लोंढे यांनी केला आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी प्रचंड ओढाताण सुरू आहे. मंत्रिमंडळ स्थापन होत नाही, म्हणून एकनाथांच्या (Eknath Shinde) राज्यात महाराष्ट्र मात्र अनाथ झाल्याचा आरोपदेखील अतुल लोंढे यांनी केला आहे. शिंदे गटाला भाजपा किंवा इतर नोंदणीकृत पक्षामध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असेही लोंढे म्हणाले.
शिवसेनाही संपवायची, सत्ताही मिळवायची, हा जो प्रयत्न भाजपाने केला आहे, ही कुसंस्कृती आहे. सध्या राज्यात शेतकरी त्रस्त झाला आहे, अतिवृष्टी झाली आहे, अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. पिक विम्याचा, बी-बियाणांचा प्रश्न समोर आहे. हे सगळे वाऱ्यावर सोडून दिले आहे. आता तर कहर केला आहे. मंत्रिमंडळ स्थापन करता येत नाही, ही अतिशय अक्षम्य अशी बाब आहे. मंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांना देऊन टाकले आहेत. त्यामुळे मंत्रालयाचे सचिवालय करण्याच्या या मनमानी राजकारणाचा आम्ही निषेध करतो, असे अतुल लोंढे म्हणाले.
सरदार पटेल यांनी देश जोडून एक केला आहे, सरदार पटेल आणि शेतकऱ्यांचा मुद्द्यावर सरदारी पदवी मिळवली आहे. मात्र अमित शाह यांनी देशामध्ये धर्मांधता पसरवत एका धर्माला दुसऱ्या धर्मासोबत लढवायचे काम केले आहे. म्हणून अमित शाह एका गिरोहाचे सरदार असल्याची टीका देखील लोंढे यांनी केली आहे. अनुराग ठाकूर यांनी आज बोलताना मला अमित शाह यांच्यामध्ये सरदार पटेल यांची प्रतिमा दिसते, असे विधान केले होते. त्यांच्या याच विधानाला अतुल लोंढे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.