पुणे : सीएनजीच्या (CNG) दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामतीमध्ये ऑटोरिक्षांचे भाडेही वाढले आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (Pune RTO) अधिकाऱ्यांनी नुकतेच जाहीर केले, की पहिल्या दीड किमीचे भाडे सध्याच्या 21 रुपयांवरून 1 ऑगस्टपासून 23 रुपये करण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर प्रति किमी भाडे आधीच्या 14 रुपयांऐवजी 15 रुपये असेल. अनेक ऑटोरिक्षा संघटनांनी सीएनजीच्या दरात वारंवार वाढ होत असल्याने भाडे वाढवण्याची मागणी केली होती. पुणे जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील आरटीएने (प्रादेशिक परिवहन प्राधिकरण) याचा विचार केला आणि ऑटो चालकांना थोडा आधार देण्यासाठी भाडे वाढवण्यात आले. नवीन भाडे रचना पुढील महिन्यापासून लागू होणार आहे आणि ऑटोरिक्षा (Autorickshaw) चालकांना नवीन भाडे रचनेनुसार त्यांच्या वाहनांचे मीटर रिकॅलिब्रेट करण्यासाठी आरटीओशी संपर्क साधावा लागणार आहे, अशा प्रकारचे आवाहन करण्यात आल्याचे आरटीओ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, आरटीएने पहिल्या 1.5 किमीसाठी ऑटोरिक्षाचे भाडे रु. 18 वरून रु. 21 आणि त्यानंतर प्रत्येक किमीसाठी रु. 14ने वाढवले होते. ही दरवाढ चार वर्षांनंतर आली होती. साधारणत: दर तीन ते चार वर्षांनी आरटीओकडून ऑटोरिक्षाचे भाडे वाढवले जाते. दरम्यान यावेळी सीएनजीच्या चढ्या किमतींमुळे अवघ्या 8-9 महिन्यांनंतर भाडेवाढ झाली. त्यामुळे चालकांसाठी एक मोठी डोकेदुखी बनली होती. शहरात एक किलो सीएनजीची किंमत 85 रुपये आहे. गेल्या वर्षी डिसेंबरपासून 52 रुपयांवरून 85 रुपयांपर्यंत किंमती जवळपास 11 पटीने वाढल्या आहेत.
भाडेवाढीमुळे चालकांना फायदा होईल की नाही, याचा विचार चालकांना करावा लागणार आहे. सीएनजी व्यतिरिक्त सर्व वस्तूंच्या किंमती आता खूप जास्त पटीने वाढल्या आहेत. दरम्यान, आम्ही पुन्हा मीटर कॅलिब्रेशनसाठी जाणार नाही. कारण ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. आरटीओने योग्य दरपत्रक घेऊन ते सर्व ऑटोरिक्षा चालकांना द्यावे. तसेच, आरटीओने बाइक टॅक्सीवर कारवाई करणे आवश्यक आहे. परिवहन विभागाने ऑटोरिक्षांसाठी नवीन परमिट देणे त्वरित थांबवावे, असे काही रिक्षाचालक संघटनेचे म्हणणे आहे.