दादा खुश म्हणजे पवारसाहेब खुश! मला खुश करा; अजित पवारांचं भावनिक आवाहन
Ajit Pawar Gavbhet Daura Full Speech : अजित पवार सध्या गावभेट दौरा करत आहेत. या गावभेट दौऱ्यांदरम्यान ते स्थानिकांशी संवाद साधत आहेत. आज सकाळपासूनच अजित पवार हे दौरा करत आहेत. यावेळी बारामतीकरांना अजित पवारांनी भावनिक आवहन केलं आहे. वाचा सविस्तर....
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बारामतीत दौरा करत आहेत. बारामती मधील सावळ इथं गावभेट दौऱ्यासाठी अजित पवार दाखल झाले. यावेळी त्यांनी उपस्थित स्थानिक नागरिकांना भावनिक आवाहन केलं. लोकसभेला शरद पवार साहेबांना या वयात धक्का बसेल, याचा विचार करून तुम्ही सुप्रियाला मतदान करून निवडून दिलं. आता मला मतदान करा. शरद पवार साहेबांना खुश केलं आता मला खुश करा. मी खुश म्हणजे साहेब खुश, त्यामुळे या निवडणुकीत मला खुश करा, असं अजित पवार म्हणाले.
बारामतील विकासकामांवर भाष्य
बारामतीत हजारो कोटी रुपयांची कामे चालू आहेत. आरोग्य बाबतीत बारामतीत अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. 2 कोटी 30 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले आहेत. हे पैसे थेट खात्यात जमा होत असल्याने भ्रष्टाचार होणार आहे. बारामतीत 1 लाख 21 हजार महिलांना लाडकी बहीण योजना लाभ मिळतोय. ही योजना सुरू ठेवायची असेल तर महायुतीचे सरकार आणावे लागेल. गरीब वर्गाची चांगली परिस्थिती करण्यासाठी योजना सुरू केलीय. आता यापुढे वीज ही सौरऊर्जा पध्दतीने देणार आहे, असा शब्द अजित पवार यांनी दिला आहे.
अजित पवार काय म्हणाले?
सर्व योजना सुरू ठेवायच्या असतील तर घड्याळ बटन दाबा… पवार साहेब यांच्यानंतर काम करणं अवघड होतं. परंतु मी विकास कामात अधिक भर घातलीय. आता शेतीसाठी वीज रात्रीची नव्हे तर दिवसा देणार आहे. सौरऊर्जा ज्यास्तीत राबविण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्याने दिवसभर काम करायचे आणि रात्री निवांत झोपायचे, असं चित्र निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं अजित पवार म्हणाले.
लोकसभेला तुम्ही कोणतं बटन दाबलं हे तुम्हाला माहित आहे. साहेबाना त्रास होऊ नये म्हणून सुप्रियाला मत दिलं. आता मला मतदान करा. 1967 ते 1990 साहेब आमदार राहिले त्यानंतर मी आमदार राहिलो आहे. मी खूप विकास केलाय आणि मला अधिक विकास करायचा आहे, असं अजित पवार म्हणालेत.