अजितदादांचा थेट शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा यांच्यावर निशाणा; म्हणाले, काय पुळका आलाय…
Ajit Pawar on Pratibha Sharad Pawar : अजित पवारांनी त्यांच्या काकी, शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार सध्या बारामतीत गावभेट दौरा करत आहेत. या दौऱ्यावेळी अजित पवार यांनी प्रतिभा पवार यांचा उल्लेख केला आहे. वाचा सविस्तर...
राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होतेय ती बारामती विधानसभा मतदारसंघाची… कारण बारामतीत पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार असा सामना होतोय. अजित पवार विरुद्ध त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत होत आहे. युगेंद्र पवार यांचा प्रचार करण्यासाठी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या देखील मैदानात उतरल्या आहेत. त्या ठिकठिकाणी जात लोकांना भेटत आहेत. यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. निवडणूक प्रचारासाठी अजित पवार गावभेट दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी त्यांच्या काकी प्रतिभा पवार यांचं नाव घेत विधान केलं आहे.
“प्रतिभाकाकींना विचारणार की…”
शरद पवार यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात प्रतिभा पवार प्रचारात दिसायच्या मात्र नंतर त्या प्रचार करताना दिसल्या नाहीत. मात्र यंदा राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांचा प्रचार करताना दिसत आहेत. यावर अजित पवारांनी भाष्य केलंय. काय नातवाचा पुळका आलाय कळेना. काकींना निवडणूक झाल्यावर विचारणार आहे. आता वेळ नाही विचारण्याची. त्यांना विचारणार आहे की प्रचाराचा एवढा का पुळका आला होता?, असंही अजित पवार म्हणाले. प्रतिभा पवार सध्या गावागावात प्रचार करीत आहेत. यावर कार्यकर्ता म्हणाला दादा तुमच्यावर प्रेम आहे. त्यावरही अजित पवारांनी टिपण्णी केली. असलं प्रेम नको रे बाबा…, असं अजित पवार कार्यकर्त्याला म्हणाले.
अजित पवार यांचा गावभेट दौरा
राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित पवार आज गावभेट दौरा करीत आहेत. बारामतीमधील पानसरेवाडी इथं भेट देऊन गावभेट दौऱ्याला सुरुवात केली आहे. बारामतीमधील पानसरे वाडी, जळगाव सुपे, कऱ्हावागज, काऱ्हाटी आणि अंजनगाव या गावांचा अजित पवार गावभेट दौरा करणार आहेत. गावभेट दौऱ्या दरम्यान अजित पवार हे नागरिकांशी संवाद साधून मार्गदर्शन देखील करीत आहेत. पानसरेवाडीत बोलत असताना अजित पवारांनी प्रतिभा पवार यांच्या प्रचारावर भाष्य केलं.
नवीन लोकांना संधी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 2 कोटी 30 लाख महिलांना थेट खात्यावर पैसे देतोय. झिरो बिल सर्वांना येणार आहे. लोकसभेला गंमत केली आता विधानसभेला गंमत करू नका. नाहीतर तुमची जंमत होईल. बारामतीकरांना पुन्हा वाली राहणार नाही. साहेब दीड वर्षांनी निवडणूक लढविणार नाहीत. शरद पवार यांचा मोठा फोटो लावला जातोय. साहेब यांच्यापेक्षा मी ज्यास्त विकास केलाय असं म्हटलं तर म्हणतील साहेबाला कमी लेखतोय, असं अजित पवार म्हणाले.