लोकसभा निवडणूक 2024 मध्ये बारामती हा महाराष्ट्रातील हायहोल्टज मतदारसंघ आहे. शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात सध्या याच कुटुंबातील सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभे करण्यात आले आहे. महायुतीचा उमेदवार मताधिक्याने निवडून येण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे बारामतीतमधील गावागावात धमक्या देत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. व्यापारी आणि उद्योजकांना नोटीस पाठविण्यात येत आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची भाषा सुरु असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. जनता मात्र कुणाच्या पाठिशी आहे, हे लवकरच कळेल, हे त्यांनी सांगितले.
त्यांना उमेदवार मिळण्याची मारामार
राज्यातील काही मतदारसंघात भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला आहे. मुंबईत असे दोन ते तीन मतदारसंघ आहेत. तिथे महायुती उमेदवार जाहीर करु शकली नाही. दक्षिण मुंबई, वायव्य मुंबईत त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. इतर काही ठिकाणी महायुतीने औपचारिकता म्हणून उमेदवार दिले आहेत. त्यात उज्ज्वल निकम यांना भाजपने उभं केले आहे. ठाण्यात, मुख्यमंत्र्यांच्या गडात, बालेकिल्ल्यात अजून उमेदवारी देण्यात आली नाही. नाशिकमध्ये हीच परिस्थिती आहे. आम्ही राज्यात 35 पेक्षा अधिक जागा जिंकत आहोत, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
धमक्यांचे सत्र
राज्यातील अनेक मतदारसंघात फडणवीस आणि अजित पवार धमक्या देत आहेत. सोलापुरात उत्तम जानकर यांच्या नावाने धमकी देण्यात येत आहे. बारामती आणि शिरूर मतदार संघामध्ये स्वतः अजित पवार जाहिरपणे धमक्या देतात. व्यापारी आणि उद्योजक ही सगळं काम करणारी मंडळी. त्यांना बोलवून दंड करण्याच्या धमक्या देण्यात येत आहे. त्यामुळे धमक्या देण्याची भाषा जर तुम्ही करत असाल तर राज्यातील जनतेने ठरवलेले आहे की काय करायचं ते. तुमच्या धमक्यांना 5-25 लोक घाबरतील. तुमच्याशी आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, असे ठेकेदार घाबरतील. पण जनता हा दबाव झुगारेल असे राऊत म्हणाले.
गावागावात धमकीसत्र
बारामती लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने अजित पवार गावागावातल्या लोकांना धमक्या देतात. मला मताधिक्य नाही दिले तर बघून घेईन, अनेक वर्ष आपण विधानसभेत आहात ही भाषा तुम्हाला शोभते का? निवडून यायचे असेल तर लोकांना निर्णय घेऊ द्या तुम्ही खरे की शरद पवार खरे, असा चिमटा त्यांनी काढला.
बारामतीसाठी सर्व एकत्र
बारामतीसाठी दिल्ली-गुजरातमधील कोणी शरद पवार यांच्या पराभवाची भाषा करत असेल तर आम्ही मराठी माणूस म्हणून सर्व एकत्र आहोत. बारामती मध्ये शरद पवारांचा पराभव आम्ही करून दाखवल्याने देशाला दाखवत असेल तर ते शक्य नाही. आम्ही सगळे पवार साहेबांच्या बरोबर आहेत. उद्धव ठाकरे उद्या खडकवासला येथे सभा घेत आहेत. सुप्रिया सुळे यांच्यासोबत आम्ही सर्व भावंडं आहोत, असे ते म्हणाले.