यंदा वेगळा पाडवा का? पवार कुटुंबात फूट?; पार्थ पवार म्हणाले, आता इथून पुढे…
Parth Pawar on Diwali Padwa 2024 : बारामतीत यंदा परंपरे प्रमाणे दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. परंतू दोन वेगवेगळ्या ठिकाणी पवार कुटुंबिय दिवाळीचा पाडवा साजरा करत आहेत. शरद पवार गोविंद बागेत कार्यकर्त्यांना भेटत आहेत. अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत आहे. वाचा...
अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. शरद पवार आणि अजित पवार या दोन गटांमध्ये राष्ट्रवादी पक्ष विभागला गेला. राजकीय पातळीवर सुरु असलेला हा संघर्ष आता कौटुंबिक पातळीवर देखील पाहायला मिळत आहे. इथून मागे पवार कुटुंब एकत्र दिवाळी सण साजरा करायचं. पाडव्याला शरद पवार यांच्या बारामतीतील ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी होत असत. मात्र आता यंदा पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडवा साजरा केले आहेत. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
यंदा वेगळा पाडवा का?
दोन दिवाळी पाडवा आता इथून कायम राहणार आहेत. कार्यकर्त्यांची भावना होती की आपण वेगळा पाडवा करायला पाहिजे. त्यानुसार अजितदादांनी निर्णय घेतला. आपण आता हे कायम करणार आहोत. एकत्र पाडवा केला असता तर जनतेत संभ्रम निर्माण झाला असता. दोन पक्ष आणि एकत्र येतात हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे. त्यांचा आणि आमचा पक्ष आता वेगळा आहे. त्यामुळे इथून पुढे हे दोन पाडवे साजरे होणार आहेत, असं पार्थ पवार म्हणाले.
पवार कुटुंबात फूट?
दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाडवा साजरा केला जात असल्याने पवार कुटुंबात फूट पडली आहे का? यावर चर्चा होत आहे. यावरही पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही इथून पुढे पाडवा वेगळा करणार असलो तरी मात्र कुटूंब म्हणून आम्ही एकच आहोत. जेव्हा काही फॅमिली कार्यक्रम असेल तेव्हा आम्ही एकत्र येऊ. पण आता आमचे राजकीय विचार वेगळे आहेत. कधी जुळणार नाहीत, असं पार्थ पवारांनी स्पष्टपणे सांगितलं. मी शरद पवार यांना भेटायला नेहमी जातो. यावेळी पण जाणार आहे. मोठ्या लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी जायला पाहिजे, असंही ते म्हणालेत.
युगेंद्र पवारांना दिलेली उमेदवारी आम्हाला आवडलेली नाही. मात्र आता सामोरं जावं लागणार आहे. हे आता कायम असणार आहे. हे थांबायला पाहिजे होतं. मात्र आता थांबणार नाही. एकत्र येणायासाठी आपण प्रयत्न केलेत. मात्र यश आलं नाही, आता विषय सोडला आहे, असंही पार्थ म्हणाले.