हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना शब्द, म्हणाले…
Sharad Pawar on Harshvardhan Patil : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी पक्षात घेणार का? यावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. शरद पवारांनी कार्यकर्त्यांना शब्द दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार ठिकठिकााणी दौरा करत आहे. ते आगामी निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करत आहेत. विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशातच माजी मंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावर शरद पवार यांनी स्वत: स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ, असं शरद पवार म्हणालेत.
हर्षवर्धन पाटलांबाबत काय म्हणाले?
शरद पवार आज बारामतीत आहेत. बारामतीमधील गोविंद बाग यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली. इंदापूरमधून प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे यांचे कार्यकर्ते देखील गोविंदबागेत आले आहेत. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. इंदापूरमधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन हर्षवर्धन पाटलांबाबत निर्णय घेतला जाईल. निवडून येण्याची क्षमता याच्यात तडजोड केली जाणार नाही आणि निवडून येण्याची शंकेची स्थिती इंदापूरमध्ये नाही. तुमचं प्रतिनिधित्व करणारा लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठवला पाहिजे. याबाबत मनात कोणतीच शंका नाही, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
निवडणूक कधी होणार?
उद्याचा निकाल कार्यकर्त्यांनी मनात करून ठेवला आहे. महाविकास आघाडीत तीन लोकांना उमेदवार निवडण्याचा अधिकार दिला आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले, शिवसेनेचे संजय राऊत यांना अधिकार देण्यात आलेत. ज्या तालुक्यात इच्छुक आहे त्याचा स्वतंत्र सर्वे करायचा आहे. गावागावात जाऊन सर्वसामान्य लोकांची मत लक्षात घ्यायचा आहे. 6 किंवा 10 ऑक्टोबर तारखेला निवडणूक तारखा जाहीर होतील माझा अंदाज आहे. 15 ते 20 नोव्हेंबरला निवडणूक पार पडेल, असं शरद पवार म्हणाले.
राज्यात सगळीकडे विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान 400 जागा निवडून येतील असं सांगत होते. त्यामुळे वेगळं वातावरण तयार झालं होतं. महाराष्ट्र राज्यात मात्र वातावरण वेगळं होतं. आम्ही तीन पक्ष एकत्र आलो. त्यावेळेस माझ्या वाचनात आले की यांचे बोटावर मोजण्याइतके लोक निवडून येणार नाहीत. तरुण पिढी आणि सर्वसामान्य यांच्याशी आमची नाळ जोडून आहे. सर्वसामान्य लोकांच्या कष्टाने लोकसभेला महाविकास आघाडीच्या 31 जागा निवडून आल्या. 10 पैकी 8 जागा राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार निवडून आले. लोकांची मतं जुळून आली. त्यामुळे हे शक्य झालं, असं शरद पवार म्हणाले.
बारामती लोकसभा निवडणुकीवर बोलताना शरद पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. लोकसभेला बारामती जागा आम्ही जिंकणार असं विरोधक सांगत होते. परंतु लोकांशी बांधिलकी असल्याने बारामती विजय निश्चित होता. विधानसभा निवडणुकीचं वातावरण तयार झालंय. काही लोकांना वातावरण लक्षात आलं आहे, असं शरद पवार म्हणालेत.