बिटकॉईन विकून पैसे निवडणुकीत वापरल्याचा सुप्रिया सुळेंवर आरोप; शरद पवारांनी ‘त्या’ अधिकाऱ्याचा इतिहास सांगितला, म्हणाले…
Sharad Pawar on Supriya Sule Allegation : बिटकॉईन विकून पैसे निवडणुकीत वापरल्याचा सुप्रिया सुळेंवर आरोप करण्यात आला आहे. सुप्रिया सुळेंवरील आरोपांना शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. आरोप करणाऱ्या अधिकाऱ्याच्या इतिहासावर शरद पवारांनी भाष्य केलंय. वाचा सविस्तर...
काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीच्या काळात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीत बिटकॉईन विकून पैशांचा वापर केला असल्याचा आरोप सुप्रिया सुळे, नाना पटोले यांच्यावर करण्यात आला आहे. माजी आयपीएस अधिकारी रविंद्रनाथ पाटील यांनी केला आहे. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी तक्रार केली, तो एकेकाळचा अधिकारी जेलमध्ये होता. जो अधिकारी जेलमध्ये होता. त्याच्या म्हणण्याला एवढं महत्व देण्याची आवश्यकता नाही, असं शरद पवार म्हणालेत.
सुप्रिया सुळे यांच्यावरील आरोप काय?
सुप्रिया सुळे यांचे तीन ऑडिओ मेसेज आहेत. बिटकॉईन विका आणि मला कॅश द्या. त्यात त्या असंही म्हणत आहेत की चौकशीची चिंता नका करू. आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही सगळं सांभाळून घेऊ. मी त्यांना विचारलं की हे कोण आहेत? तर ते म्हणाले की या सुप्रिया सुळे आहेत, असं रविंद्रनाथ पाटील यांनी म्हटलं आहे. ही व्हॉईस नोट अमिताभ गुप्ता आणि नाना पटोले यांच्यामधील आहे. यात पटोले म्हणतायेत की अजून अमिताभ पैसे नाही आहेत, असं हे संभाषण असल्याचा दावा रविंद्रनाथ पाटील यांनी केला आहे.
शरद पवार यांच्याकडून मतदान करण्याचं आवाहन
महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या हातात आहे. अपेक्षा एवढीच आहे की प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मध्यंतरी लोकसभेची निवडणूक झाली. तेव्हा 67 % लोकांनी मतदान केलं. ईशान्येकडील राज्य 70 – 75 % च्या पुढे मतदान करतात. मतदानाच्या टक्केवारीत महाराष्ट्राने मागे राहता कामा नये. म्हणून माझं प्रत्येक नागरिकाला आवाहन आहे की तुम्ही मतदान करा. जी व्यक्ती, जो पक्ष तुम्हाला योग्य वाटत असेल त्यांना तुम्ही मतदान करा. पण मतदान करा, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर नागपूरच्या काटोलमध्ये परवा दिवशी हल्ला झाला. यात ते गंभीररित्या जखमी झाले. यावर शरद पवारांनी भाष्य केलं. महाराष्ट्रात कायम शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडते. पण नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला हा अस्वस्थ करणारा आहे, असं शरद पवार म्हणाले.