बारामती : बारामतीच्या दशरथ जाधव यांनी 66व्या वर्षी जगातली सर्वात अवघड समजली जाणारी सायकल स्पर्धा (Cycling competition) पूर्ण केली आहे. 66व्या वर्षी स्पर्धा पूर्ण करणारे दशरथ जाधव हे भारतातील एकमेव सायकलपटू ठरले आहेत. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीचे सुपुत्र आणि पुण्याचे उद्योजक दशरथ दिनकर जाधव (Dashrath Jadhav) यांनी इंग्लंडच्या लंडन आणि स्कॉटलंडच्या एडिनबर्ग या दोन ‘कॅपिटल’ शहरांमध्ये होणारी जगातील सर्वात अवघड समजली जाणारी 1520 किमी (930 मैल) सायकल स्पर्धा वयाच्या 66व्या वर्षी 125 तास 33 मिनिटे या विक्रमी वेळेत पूर्ण करून इतिहास (History) रचला आहे. लंडन एडिनबर्ग लंडन ही 1540 किलो मिटरची अत्यंत कठीण अशी सायकल स्पर्धा 1520 किमी सायकलिंग 128 तासांत पूर्ण करणे आवश्यक होते. जाधव यांनी ठरलेल्या वेळेआधीच स्पर्धा जिंकली.
यामध्ये एकूण 20 कंट्रोल पॉइंट्स होते आणि दोन कंट्रोल पॉइंट्समधील अंतर कोणत्याही सोयी किंवा मदती शिवाय तेही ठराविक वेळेतच पूर्ण करायचे असते. स्पर्धा चालू असताना नियमानुसार लहान चूक जरी झाली तरी स्पर्धकाला बाद ठरविले जाते. अशामध्ये स्पर्धकाला शारीरिक तसेच मानसिक अशा दोन्हीचा समतोल साधत जवळपास 47, 564 फूट चढ आणि 47,563 फूट उतार असलेल्या डोंगराळ रस्त्यावरून ऊन, वारा, पाऊस असतानाही अतिशय किचकट परिस्थितीत ही स्पर्धा पूर्ण करावी लागते.
दशरथ दिनकर जाधव यांनी ही स्पर्धा 125 तासांतच पूर्ण करून भारतातील एकमेव स्पर्धक ज्यांनी ही स्पर्धा वयाच्या 66व्या वर्षी पूर्ण करत एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. त्यांनी महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची मान उंचावली आहे.
इतिहास घडवायला अंगात तेवढी धमक आणि रक्तात वेड लागते. या स्पर्धेत अनेक भारतीयांचा समावेश होता. परंतू सर्वात वयस्कर स्पर्धक असूनदेखील वेळेच्या 3 तास आधीच जाधव त्यांनी अनेक तरूण स्पर्धंकाच्या आधी ही स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेमध्ये 120 भारतीय सायकलस्वारांनी भाग घेतला होता. त्यातील 47 भारतीय सायकल स्वरांनी स्पर्धा पूर्ण केली आहे.
दशरथ जाधव यांनी वयाच्या 60 व्या वर्षी आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण करून किताब मिळाला होता. त्यानंतर त्यांनी सलग 7 वेळा आयर्न मॅन स्पर्धा जिंकून पूर्ण आयर्न मॅनचा किताब मिळवणारे जाधव हे सर्वात वयोवृद्ध भारतीय स्पर्धक आहेत.