Pune BH-series vehicle : बीएच-सिरीज वाहन नोंदणीच्या मागणीत पुण्यात वाढ; काय आहे बीएच सिरीज? वाचा सविस्तर…
ही एक विशेष वाहन नोंदणी प्रक्रिया आहे, जी केंद्रीय परिवहन विभागाने गेल्या वर्षी देशभरात वारंवार बदली होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू केली होती. यामुळे प्रत्येक वेळी बदली झाल्यावर त्यांना त्यांच्या वाहनांची नोंदणी बदलण्याच्या प्रक्रियेतून जावे लागणार नाही.
पुणे : महामारीनंतर हळूहळू वाहनांची विक्री वाढत असल्याने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय विभागात (Pune regional transport office division) भारत म्हणजेच बीएच मालिकेअंतर्गत वाहन नोंदणीची मागणीही वाढत आहे. ही नोंदणी ऑक्टोबर 2021मध्ये सुरू झाल्यापासून, पुणे विभागात आतापर्यंत एकूण 717 चारचाकी आणि 235 दुचाकींची BH मालिकेअंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने ऑक्टोबर 2021मध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या वाहनांसाठी BH मालिका नंबर प्लेट्स लाँच करण्याची घोषणा केली होती. आत्तापर्यंत, मोटार वाहन कायदा (Motor Vehicles Act) 1988 अंतर्गत, एका राज्यात नोंदणीकृत वाहन 12 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी दुसर्या राज्यात ठेवल्यास नवीन नोंदणी करावी लागत असे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याचे वाहन सोबत घेऊन दुसर्या राज्यात स्थलांतरित व्हावे लागते तेव्हा त्याला प्रथम वाहनाची नोंदणी असलेल्या राज्यातून एनओसी मिळवावी लागते.
वारंवार बदली होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची योजना
ही एक विशेष वाहन नोंदणी प्रक्रिया आहे, जी केंद्रीय परिवहन विभागाने गेल्या वर्षी देशभरात वारंवार बदली होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू केली होती. यामुळे प्रत्येक वेळी बदली झाल्यावर त्यांना त्यांच्या वाहनांची नोंदणी बदलण्याच्या प्रक्रियेतून जावे लागणार नाही. पुणे विभागात या बीएच सिरीज नोंदणीसाठी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत आम्ही या मालिकेअंतर्गत 717 कार आणि 235 मोटारसायकलींची नोंदणी केली आहे आणि मागणी आणखी वाढत आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले.
गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीयेनंतर वाढ
यंदा, गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीया नोंदणीनंतर वाहनांच्या एकूण विक्रीत वाढ झाली आहे. वर्षभरात बीएच मालिकेसाठी नोंदणीही वाढेल, अशी अपेक्षा आहे. पुणे हे एक असे शहर आहे जिथे केवळ सरकारी कर्मचारीच नाही तर आयटी, उत्पादन आणि इतर उद्योग अशा विविध क्षेत्रातील लोक बाहेरच्या राज्यातून कामासाठी येतात. जेव्हा ते काही वर्षांसाठी येथे येतात, तेव्हा ते आता त्यांच्या नवीन खरेदी केलेल्या वाहनांची बीएच सीरीज अंतर्गत नोंदणी करण्यास प्राधान्य देतात, असे ते पुढे म्हणाले.
कंटाळवाणी प्रक्रिया टळली
दुसर्या राज्यात नवीन नोंदणीची नियुक्ती करण्यासाठी मूळ राज्याची NOC आवश्यक होती. त्यानंतर नवीन नोंदणी करणे आवश्यक होते. कारण मोटार वाहन कायदा, 1988च्या कलम 47नुसार, एखादे वाहन 12 महिने त्याच नोंदणीसह दुसर्या राज्यात राहू शकते, ज्या दरम्यान त्याची नवीन राज्यात पुन्हा नोंदणी करणे आवश्यक होते. मूळ राज्यातील रोड टॅक्सच्या परताव्यासाठी देखील प्रो-रेटा आधारावर अर्ज करावा लागतो. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यापूर्वी अधिसूचित केलेली BH मालिका सुरू केल्यानंतर ही कंटाळवाणी प्रक्रिया आता दूर झाली आहे.