आधी ड्रोनची टेहळणी, आता घरांवर दगडांचा मारा, घरांना कड्या लावल्या; पुण्यात काय घडतंय?
काही घरांच्या दरवाजाला बाहेरून कड्या घातल्या जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. या प्रकारामुळे गावातील लहान मुले आणि महिला प्रचंड घाबरल्या आहेत.
पुण्याच्या भोर येथील बारे खुर्द गावात अद्यात ड्रोनच्या घिरट्या घालण्याचा प्रकार सुरु झाल्याने गावकरी भयग्रस्त झाले असतानाच आता नवीन प्रकार घडत आहे. रात्री गावातील घराच्या दाराच्या कड्या लावण्याचा प्रकार घडत आहे. तरी काही घरांच्या दारावर दगड फेकण्याचे भीतीदायक प्रकार घडत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांची रात्रीची झोप उडाली आहे. या प्रकारामुळे आता गावात आता पोलीसांनी पहारा करावा अशी मागणी होत आहे.
भोर येथील बारे खुर्द गावात अज्ञात ड्रोनच्या घिरट्यानंतर आता घरांवर रात्रीच्यावेळी कोणीतरी अज्ञात व्यक्ती दगड टाकत आहे. यामुळे गावातील तरुण मंडळी आता गावात जागता पहारा करण्याचा निर्णय घेतला आहे. भोर तालुक्यात गेल्या काही दिवसांपुर्वी अज्ञात ड्रोन घिरट्या घालीत होते. त्याच काळात बारे गावच्या हद्दीतही ड्रोन फिरत होते. 29 जुन रोजी रात्री सुमारे एक वाजता गावात एक अज्ञात चार चाकी गाडी न थांबता फिरुन गेली. त्यानंतर थोड्या वेळात 6 ते 7 अनोळखी व्यक्तींनी हातामध्ये कोयते घेऊन दोन घरांच्या कड्या वाजविल्या त्यामुळे गावामध्ये आरडा ओरडा झाल्याने ग्रामस्थ जमा झाले. गावातील लोकांनी त्यांचा पाठलाग केला परंतू ते रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्यानंतर ग्रामस्थांनी गावात दोन तास गस्त घातली होती. परंतू कोणीही आढळून आले नाही. त्यानंतर गावामध्ये दररोज रात्री अकरानंतर घरावर दगड फेक होत आहे.
सीसीटीव्ही बसविण्याची मागणी
भोर तालुक्यातील बारे खुर्द येथील गावकऱ्यांना या प्रकरणी संरक्षण मिळावे यासाठी बारे खुर्दच्या ग्रामपंचायतीने भोरचे तहसिलदार सचिन पाटील आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. सरपंच सविता गायकवाड, उप सरपंच दिपक खुटवड, सुरेश खुटवड, भारती गायकवाड यांनी हे निवेदन दिले आहे. भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी भोर पोलिसांना संरक्षणाची मागणी केली आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे. बारे गावच्या पोलीस पाटलांशी चर्चा करुन संपुर्ण गावाची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल पोलिसांनी म्हटले आहे.