Adani Group : पुण्यात अदानींची मोठी गुंतवणूक; फिनोलेक्सकडून खरेदी केली 25 एकर जमीन, प्लॅन तरी काय
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या समूहाने पुण्यात एंट्री घेतली आहे. त्यासाठी समूहाने मोठी गुंतवणूक केली आहे. फिनोलेक्सकडून 25 एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये समूहाने एक कंपनी स्थापन केली होती.
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगजक गौतम अदानी यांचा समूह राज्यात पुन्हा गुंतवणूक करत आहे. पुण्यातील फिनोलेक्स कंपनीची 25 एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे. सूत्रांनुसार त्यासाठी अदानी समूहाने जवळपास 471 कोटी रुपये मोजले आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये पण समूहाने अदानी इलेक्ट्रिसिटी औरंगाबाद लिमिटेड ( AEAL) ही कंपनी स्थापन केली होती. त्यानंतर विदर्भातही समूहाने मोठी उलाढाल केली. आता पश्चिम महाराष्ट्रात पुण्यामध्ये कंपनीने ही मोठी गुंतवणूक केली आहे.
डेटा सेंटर सुरु करणार
ET च्या वृत्तानुसार, पुण्यात अदानी समूह डेटा सेंटर स्थापन करत आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहण करण्यात आले आहे. कंपनीच्या टेराविस्टा डेव्हलपर्सने फिनोलेक्सकडून ही जमीन खरेदी केली. हवेली तालुक्यातील पिंपरी औद्योगिक वसाहतीत ही 25 एकर जमीन ताब्यात घेण्यात आली. वृत्तानुसार, त्यासाठी अदानी समूहाने जवळपास 471 कोटी रुपये मोजले.
23.52 कोटींची स्टॅम्प ड्यूटी
जमिनीचा व्यवहार या महिन्याच्या सुरुवातीला झाला. जमीन नोंदणी प्रक्रिया 3 एप्रिल रोजी पूर्ण झाली. त्यासाठी समूहातील कंपनी टेराविस्टा डेव्हलपर्सने 23.52 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) जमा केले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने हा भूखंड पूर्वी स्वस्तिक रबर प्रोडक्ट्सला भाडेपट्ट्यावर दिला होता. अर्थात या सर्व प्रक्रियेविषयी फिनोलेक्स समूह आणि अदानी समूहाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यांच्या भूमिकेनंतर याविषयीची माहिती समोर येईल.
डेटा सेंटरसाठी संयुक्त उपक्रम
डेटा सेंटर हा भविष्यातील उद्योग मानण्यात येत आहे. अदानी समूहाने या व्यवसायासाठी मोठी योजना तयार केली आहे. अदानी समूहाची मुख्य कंपनी अदानी एंटरप्राईजेसने एजकॉनेक्ससोबत त्यासाठी हातमिळवणी केल्याचे समजते. दोन्ही कंपन्यांचा संयुक्त उपक्रम डेटा सेंटर व्यवसाय चालविणार आहेत. दोन्ही कंपन्यांचा त्यासाठी 50-50 वाटा असेल. एजकॉन यापूर्वी चेन्नई, नवी मुंबई, नोएडा, विशाखापट्टनम आणि हैदराबाद सारख्या शहरात यापूर्वीच डेटा सेंटरवर काम करत आहेत. संयुक्त उपक्रमातंर्गत पुढील दशकात 1 गीगावाट क्षमतेचे डेटा सेंटरचे नेटवर्क उभारण्याची योजना आहे.
मराठवाड्यात पण कंपनी
अदानी ट्रान्समिशन ही अदानी समूहाची एक प्रमुख कंपनी आहे. अदानी ट्रान्समिशनची एक उपकंपनी मराठवाड्यात अस्तित्वात आली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी औरंगाबाद लिमिटेड ( AEAL) असे या कंपनीचे नाव आहे. दानी ट्रान्समिशनने संपूर्ण स्वतंत्र असलेली आणि सहाय असलेली कंपनी स्थापन केली आहे. 15 मार्च 2023 रोजी ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे.