ट्रकला ओव्हरटेक करणे महागात पडले, ओव्हरटेकच्या नादात बाईक पडली अन्…
पुढे जाण्याच्या नादात तरुण वाहनांना ओव्हरटेक करायला जातात. पण कधी कधी हा प्रयत्न अंगलट येतो. ओव्हरटेक करण्याचा नाद तरुणांच्या जीवावर बेततो. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे.
पुणे : ‘अतिघाई संकटात नेई’ असे म्हणतात. याचाच प्रत्यय पुण्यातील एका घटनेवरुन आला आहे. पुण्यात ट्रकला ओव्हरटेक करणे एका बाईकस्वाराला चांगलेच महागात पडले आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात तोल जाऊन बाईक पडल्याने ट्रकच्या चाकाखाली येऊन बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ही अंगावर काटा आणणारी ही घटना घडली आहे. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
ओव्हरटेक करताना तोल जाऊन बाईक पडली
भरधाव वेगाने जाणारा दुचाकीस्वार पादचारी आणि ट्रकमधील जागेतून बाईक पुढे नेण्याचा प्रयत्न होता. मात्र याच नादात तो पादचाऱ्याला धडक देत ट्रकसमोर पडला. यावेळी ट्रकचे चाक त्याच्या डोक्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बाईकच्या धडकेत पादचारीही खाली पडला. सुदैवाने तो सुखरुप बचावला आहे.
तरुणाची ओळख अद्याप पटली नाही
घटना इतकी तात्काळ घडली की लोकांना दुचाकीस्वाराला वाचवण्याची संधीच मिळाली नाही. अपघाताची घटना पाहून उपस्थितांच्या अंगावर काटा आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला. पोलीस मयत तरुणाची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.
बुलढाण्यात अल्टो कार आणि स्कॉर्पियोमध्ये भीषण अपघात
शेगावला दर्शनासाठी चाललेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना बुलढाण्यात घडली. अल्टो कार आणि स्कार्पियो गाडीमध्ये मेहकर-जालना रोडवरील चिंचोली बोरे फाट्यावर भीषण अपघात झाला. या अपघातात अल्टोमध्ये बसलेल्या 10 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले.