चंद्रकांत पाटील यांच्याकडून सुषमा अंधारे यांची मनधरणी, पाहा काय आहे प्रकरण?
चंद्रकांत पाटील यांच्याकडून आपली मनधरणी सुरु असल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिलीय.
पुणे : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पैठण येथे भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरात पडसाद उमटले. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही त्यांच्यावर काल पिंपरीत शाईफेक करण्यात आली. त्यानंतर चंद्रकांत पाटील चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. त्यांच्यावर शाईफेक करणाऱ्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. असं सगळं घडलं असताना इकडे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वेगळा दावा केलाय. चंद्रकांत पाटील यांच्याकडून आपली मनधरणी सुरु असल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिलीय.
डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन संस्थेच्या सदस्य पदाचा राजीनामा मागे घ्या. दोन घटना वेगवेगळ्या आहेत. मी संस्थेच्या कामाविषयी काही बोललो नाही. आपण राजीनामा मागे घ्या, अशी चंद्रकांत पाटलांनी विनंती केल्याची माहिती सुषमा अंधारेंची दिली.
“काल जी घटना घडली ती निषेधार्थ आहे. मी माझी शाई कुठे वापरावी हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे. मात्र भाजपचेच नेते सातत्याने का अशी वक्तव्य करतायेत?”, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
पाहा सुषमा अंधारे आणि चंद्रकांत पाटील यांचा व्हिडीओ :
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप नेते प्रसाद लाड , मंगलप्रभात लोढा जे बोलले त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्दही काढला नाही. मात्र जे चुकलंय ते चुकलं तरी म्हणा”, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
“मी 13 डिसेंबरच्या पुणे बंदमध्ये सहभागी होणार आहे”, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.