पुणे : पुण्यात अॅमिनिटी स्पेसच्या (amenity space) मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे या विषयावर राष्ट्रवादीची भूमिका ठरवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या (NCP) स्थानिक नेत्यांची रविवारी बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपचेही (BJP) प्रयत्न सुरू झालेत. याविषयी आता भाजपने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट मागितल्याचं कळतंय. थेट शरद पवार यांना भेटून पाठिंब्यासाठी साकडं घातलं जाणार आहे. त्यामुळे अॅमिनिटी स्पेसचा विषय चांगलाच गाजताना दिसत आहे. (BJP leaders have asked Sharad Pawar for time for a meeting on the issue of amenity space)
पुणे महापालिकेच्या 185 अॅमिनिटी स्पेस आणि 85 आरक्षित जागा अशा एकूण 270 जागा दीर्घ मुदतीने भाडेतत्वावर खासगी विकासकांना देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव आता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे प्रलंबित आहे. या प्रस्तावाला महाविकास आघाडीतल्या पक्षांचा विरोध आहे तर राष्ट्रवादीची भूमिका तळ्यात-मळ्यात आहे.
भाजपनं सर्वसाधारण सभेत बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर जरी केला तरी राज्य सरकारमार्फत हा प्रस्ताव विखंडित करण्याचा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता थेट शरद पवारांना या प्रस्तावाची माहिती देण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी वेळ मागितली आहे.
भाजपकडून पुणे महापालिकेच्या हद्दीतल्या अॅमिनिटी स्पेस दीर्घ मुदतीसाठी खासगी विकासकांना भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजूर केला आहे. आता हा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे निर्णयासाठी प्रलंबित आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरूवातीला पाच उपसूचना देण्याचा निर्णय घेऊन हा प्रस्ताव मान्य करणार असल्याचं भाजपाला सांगितलं होतं. मात्र, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रस्तावावरून धुमजाव केलं होतं.
अॅमिनिटी स्पेसच्या मुद्द्यावर अजित पवार रविवारी सकाळी 11 ते 1 या वेळेत स्थानिक नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खासदार वंदना चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या बैठकीपूर्वी पुणे महानगर नियोजन समितीने तयार केलेल्या विकास आराखड्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे. अॅमिनिटी स्पेसबाबत निर्णय घेताना नागरिकांचं हित बघितलं जाईल, नगरसेवकांचं हित पाहिलं जाणार नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
इतर बातम्या :