मुंबई : संभाजी भिडे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यभरातून त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. विधानसभेतही यावरून विरोधकांनी गदारोळ घालत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडेंचा गुरूजी म्हणत उल्लेख केला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली होती. फडणवीसांवर केलेल्या टीकेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी बोलताना महाजनांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबतही वक्तव्य केलं.
भिडे गुरूजी हे भाजपचे आहेत का? समाजात भाजप बदल विष पेरण्याच काम चालू आहे. बुडणाऱ्या जहाजांमध्ये कोणी बसेल का? शासनाला बदनाम करण्यासाठी विरोधक आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. येणाऱ्या निवडणूकीत एकही जागा विरोधकांना मिळणार नाही. देशात 350 जागा आम्ही जिंकू आणि येत्या 5 वर्षात आपला देश पॉवरफूल देश असेल. संजय राऊत यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं, त्यांचा भोंगा हळूहळू कमी होत आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.
आज मैत्री दिवस आहे, अजितदादा आणि आमची मैत्री फार जुनी आहे. मैत्री असली तरी आमचा एकमेकांना राजकीय विरोध आहे. अजित पवारांनी मला वीस वर्षात एक रुपयाचाही निधी दिला नाही. निधी देणार नाही असं चॅलेंज ही त्यांनी आम्हाला दिलं होतं आणि ते पाळलंही आणि तेच दादा आता माझं कौतुक करत होते. दादा नेहमी भेटले की माझे बायसेप चेक करत असतात. मी एवढा फिट कसा याबद्दल ते विचारत असतात. राजकारणातील प्रत्येकाने तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, असं महाजन म्हणाले.
दरम्यान, दादा सुद्धा तब्येतीची काळजी घेतात. रात्री लवकर झोपतात सकाळी लवकर उठतात. अजितदादा राजकारणातील पहिले असे नेते आहेत त्यांचा दिनक्रम सकाळी सहा वाजता सुरू होतो. दादा प्रत्येक गोष्ट ही तंतोतंत पाळत असल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे.