Pune rain : दरड कोसळण्याचं सत्र सुरूच; सकाळी सिंहगड घाट रस्त्यावर तर माळशेज घाटात न्याहडी पुलाजवळ कोसळली दरड
सिंहगड घाट रस्त्यावर सकाळी एका वळणावर ही दरड कोसळली. सिंहगड किल्ल्यावरील 28 कॉर्नर म्हणजेच जगताप माचीच्या वरील भागातील दरड सकाळी कोसळली. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कुठलीही वाहतूक सुरू नव्हती, त्यामुळे कुठलीही हानी झाली नाही.
जुन्नर, पुणे : माळशेज घाट परिसरात पावसाची संततधार सुरू असून सततच्या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) न्याहडी पुलाच्या बाजूला दरड कोसळली आहे. त्यामुळे कल्याण-नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गेली आठवडाभरापासून माळशेज घाट (Malshej Ghat) परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. पुणे जिल्ह्यात मागील नऊ-दहा दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. आज सकाळीच सिंहगडाच्या (Sinhagad fort) मार्गावर दरड कोसळली. सध्या सिंहगड पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पुणे महाड मार्गावरील वरंध घाटात तर नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. प्रशासनातर्फे काळजी घेण्यात येत असली तरी सततच्या पावसामुळे कामात अडथळेदेखील येत आहेत.
सिंहगडा घाट रस्त्यावर कोसळली दरड
सिंहगड घाट रस्त्यावर सकाळी एका वळणावर ही दरड कोसळली. सिंहगड किल्ल्यावरील 28 कॉर्नर म्हणजेच जगताप माचीच्या वरील भागातील दरड सकाळी कोसळली. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कुठलीही वाहतूक सुरू नव्हती, त्यामुळे कुठलीही हानी झाली नाही. दरम्यान, अतिवृष्टीमुळे सिंहगड किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. वनविभागाने जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी पत्र दिले होते. अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता 16 जुलैपर्यंत किल्ला पर्यटकांसाठी बंद करावा, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून किल्ला बंद करण्यात आला आहे.
भोरसह भीमाशंकर, खेडमध्येही दरड कोसळण्याच्या घटना
पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात घाटमाथ्यावर गेल्या 9-10 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुणे-महाड मार्गावरील वरंध घाटात पावसाच्या कोसळणाऱ्या जोरदार सरीमुळ दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. दररोज लहान मोठ्या दरडी घाटामध्ये खाली येत आहेत. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र स्थानिक नागरिकांना याठिकाणाहून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक पथक घाटामध्ये कार्यरत ठेवण्यात आले आहे. तर शिरूर-भीमाशंकर राज्य मार्गांवर सोमवारी दरड कोसळली. एकाच दिवशी दोन ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबाही झाला होता.