सरकारने एल्गार परिषदेला अचानक परवानगी का दिली; ब्राह्मण महासंघाचा सवाल
कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करत 1 जानेवारीला एल्गार परिषदेला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, आता सरकारने 30 जानेवारीला एल्गार परिषदेसाठी परवानगी दिली आहे. | elgar parishad
पुणे: राज्य सरकारने येत्या 30 जानेवारीला पुण्यात एल्गार परिषद (elgar parishad) घेण्यास परवानगी दिल्यानंतर आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. महाविकासआघाडी सरकारच्या या निर्णयावर ब्राह्मण महासंघाने आक्षेप नोंदवला आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करत 1 जानेवारीला एल्गार परिषदेला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, आता सरकारने 30 जानेवारीला एल्गार परिषदेसाठी परवानगी दिली आहे. एका महिन्यात परिस्थितीत असा काय फरक पडला की, सरकारने एल्गार परिषदेला परवानगी दिली, असा सवाल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उपस्थित केला. (Police approve permission for Elgar Parishad Pune conclave)
एल्गार परिषदेसाठी कोण वक्ते येणार, या परिषदेचा उद्देश आणि निमित्त काय, हे कोणालाच माहिती नाही. किंबहुना या परिषदेला परवानगी देण्याची गरजही नव्हती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला पण मान्य आहे. परंतु त्या नावाखाली स्वैराचार होऊ नये एवढीच आमची इच्छा असल्याचे आनंद दवे यांनी स्पष्ट केले.
सरकार काय खबरदारी घेणार?
एल्गार परिषदेच्यावेळी स्थानिक प्रशासन आणि सरकार काय खबरदारी घेणार, हे एकदा स्पष्ट करावे. या परिषदेतील भाषणं रेकॉर्ड करून त्यांचा अभ्यास केला जाणार आहे का? तसेच एल्गार परिषदेच्या आयोजकांना योग्य समज आणि निर्बंधांची जाणीव करून देण्यात यावी. आम्ही एल्गार परिषदेचे आयोजक बी.जी.कोळसे पाटील यांनाही भेटून मागण्यांचे एक पत्र देणार असल्याची माहिती आनंद दवे यांनी दिली.
कधी आणि कुठे होणार एल्गार परिषद?
गेल्या अनेक दिवसांपासून माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील एल्गार परिषदेला परवानगी मिळावी म्हणून झटत होते. अखेर पुणे पोलिसांनी ही परवानगी दिलेली आहे. ही परिषद येत्या शनिवारी (30 तारखेला) स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे.
एल्गार परिषद वादाच्या भोवऱ्यात का?
डिसेंबर 2017 ला शनिवार वाड्यात एल्गार परिषद पार पडली. त्यानंतर कोरेगाव-भीमाला मोठी दंगल उसळली होती. या दंगलीचा थेट संबंध एल्गार परिषदेशी जोडण्यात आला अन एल्गार परिषदेवर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर हा तपास एनआयएने ताब्यात घेत देशभरात डाव्या विचारांच्या अनेक बुद्धिजीवींना अटक केली. यावरुन देशभरात डाव्या विचारांच्या लोकांनी मोठं काहूर माजवलं. या सगळ्या परिस्थितीत इतका वादंग सुरु असताना पोलिसांनी परवानगी देवो, अथवा न देवो यंदाही एल्गारची सांस्कृतिक परिषद होणारच, असा निर्धार बी. जी. कोळसे-पाटील यांनी व्यक्त केला होता.
संबंधित बातम्या:
सुप्रीम कोर्टाने परवानगी नाकारली तरी एल्गार परिषद घेऊच; तुरुंग, मरणाला घाबरत नाही: कोळसे-पाटील
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी नाकारली
(Police approve permission for Elgar Parishad Pune conclave)