ब्राह्मण नाराज, भाजपसाठी टेन्शन?; पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
2019 मध्ये पुण्यातल्या कोथरुड मतदारसंघात स्टँडिंग आमदार मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापलं होतं. तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देण्यात आली होती. तर मेधा कुलकर्णी यांचं राजकीय पुनर्वसन अद्याप झालेलं नाही.
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, कसब्यात झालेली पोस्टरबाजी यामुळं भाजपची धाकधूक वाढली आहे. ब्राह्मण उमेदवार नसल्यानं ब्राह्मण समाज नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला. टिळकांचा मतदारसंघ गेला. आता नंबर बापटांचा का ? समाज कुठवर सहन करणार ? कसब्यातील एक जागरुक मतदार. या पोस्टरचा आशय अगदी स्पष्ट आहे, की भाजपनं कसब्यातून ब्राह्मण उमेदवार का दिला नाही ? कसबा पेठ मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर इथं गेल्या 25 वर्षांपासून गिरीष बापट आणि मुक्ता टिळक यांच्या रुपात भाजपचा आमदार होता. बापट आता खासदार झालेत. तर मुक्ता टिळक यांचं निधन झालं. पण पोटनिवडणुकीत भाजपनं टिळकांच्या घरात तिकीट न देता, हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळं कसब्यात भाजपला पोस्टरमधून अशाप्रकारे सवाल करण्यात आलेत.
कसबा पेठ मतदार संघातलं जातीय समीकरण पाहिलं तर मराठा आणि ओबीसी वर्ग 35 टक्के आहे. ब्राह्मण समाज 25 ते 30 टक्के आहे. मागासवर्गीय समाज 18 टक्के तर 10 टक्के मुस्लीम समाज आहे. कसब्यात जे पोस्टर लागलेत. त्यात तिघांच्या नावाचा उल्लेख आहे. हे तिघेही ब्राह्मण आहेत.
2019 मध्ये पुण्यातल्या कोथरुड मतदारसंघात स्टँडिंग आमदार मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापलं होतं. तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देण्यात आली होती. तर मेधा कुलकर्णी यांचं राजकीय पुनर्वसन अद्याप झालेलं नाही.
मुक्ता टिळकांच्या निधनानंतर, त्यांचे पती शैलेश टिळक किंवा मुलगा कुणाल टिळकांना तिकिटाची अपेक्षा होती. मात्र घरात तिकीट न देता, हेमंत रासने यांना भाजपनं तिकीट दिलं.
2019 मध्ये गिरीश बापट खासदार झालेत. पण 2024 मध्ये त्यांचंही तिकीट कापणार का ? अशी शंका पोस्टरमधून व्यक्त करण्यात आलीय. कसब्यातून ब्राह्मण उमेदवार न दिल्यानं, हिंदू महासंघाच्या आनंद दवेंनीही पोटनिवडणुकीत उडी घेतलीय. भाजपनं ब्राह्मण समाजाला डावलल्यानं आपणही उमेदवारी अर्ज भरत असल्याचं दवे यांनी सांगितलंय.
पुण्यातल्या कसबा पेठ मतदार संघात 25 वर्षांपासून भाजपचा दबदबा आहे. कसबा पेठ मतदारसंघातून गिरीश बापट सलग 5 वेळा आमदार झाले. 1995 ते 2014 पर्यंत बापटांवर कसब्यातल्या मतदारांनी विश्वास दाखवला. 2019 मध्ये गिरीश बापट पुण्याचे खासदार झाले. त्यामुळं 2019 मध्ये कसबा पेठमधून भाजपनं मुक्ता टिळकांना उमेदवारी दिली. मुक्ता टिळकांनीही 2019 मध्ये 28 हजार मतांनी विजय मिळवत कसबा मतदार मतदारसंघ राखला.
भाजपनं कसब्यात ब्राह्मणेत्तर उमेदवार दिल्यानं, जाहीर नाराजी पोस्टरमधून दिसतेय. पण प्रत्यक्ष मतदानात काय होतं, हे EVM च्या निकालानंतर दिसेलच.