Pune vegetables : गगनाला भिडले भाज्यांचे दर; पुणेकर नागरिक अन् व्यावसायिकांचं बजेट कोलमडलं
सोमवारी गुलटेकडी मार्केटयार्डात 971 किलो टोमॅटो, सात टन कांदा, 4.7 टन बटाटा आणि 49 क्विंटल मटारची आवक झाली होती. ही आवक नेहमीपेक्षा कमी होती. त्यामुळे या भाज्यांचे दर वाढले आहेत. जिल्ह्यात यंदा पुरेसे पीक असल्याने कांद्याचे दर येत्या काही दिवसांत खाली येऊ शकतात.
पुणे : शहरातील किरकोळ बाजारात गेल्या आठवडाभरात भाज्या (Vegetables) टोमॅटो, कांदा, बटाटा आणि मटारच्या वाढत्या किमतींमुळे पुणेकरांच्या स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच एक किलो हिरवा वाटाणा 200 ते 250 रुपयांना विकला जात आहे. गेल्या महिन्यात ते 120-140 रुपये प्रतिकिलोच्या श्रेणीत होते. गेल्या आठवड्यात एक किलो कांदा (Onion) 9-13 रुपयांना विकला गेला. आता तो 20-25 रुपये प्रतिकिलो झाला आहे. त्याचप्रमाणे किरकोळ बाजारात गेल्या आठवड्यात 15 ते 20 रुपयांच्या तुलनेत आता एक किलो बटाटा 20 ते 25 रुपये दराने विकला जात आहे, असे गुलटेकडी मार्केटयार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच एपीएमसीच्या (APMC) अधिकाऱ्याने सांगितले. सोमवारी गुलटेकडी मार्केटयार्डात 971 किलो टोमॅटो, सात टन कांदा, 4.7 टन बटाटा आणि 49 क्विंटल मटारची आवक झाली होती. ही आवक नेहमीपेक्षा कमी होती. त्यामुळे या भाज्यांचे दर वाढले आहेत. जिल्ह्यात यंदा पुरेसे पीक असल्याने कांद्याचे दर येत्या काही दिवसांत खाली येऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
घर चालवणे कठीण
दररोज भाजीपाल्यांचे भाव वाढल्याने बजेटमध्ये घर चालवणे खूप कठीण झाले आहे. आधी लिंबू, आता टोमॅटो. या संपूर्ण उन्हाळ्यात आम्ही लिंबूपाणी बनवले नाही. एका भाजीचा भाव कमी झाला तर दुसरी महाग होते. बहुसंख्य कांदा उत्पादकांनी गेल्या दोन महिन्यांत घाऊक बाजारात कमी किमतीत कांदा विकला आहे. पावसाळ्यात वाजवी भाव मिळण्यासाठी त्यांनी आता माल साठवण्याचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे कांद्याची आवक प्रभावित झाली आहे, असे एपीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. हिरवा वाटाणा आणि बटाटा बाहेरून राज्यात येत आहेत. प्रादेशिक सेवन मर्यादित आहे. बहुतांश व्यापारी ते आणत आहेत. परिणामी, दर वाढले आहेत. गेल्या दोन महिन्यांतील प्रतिकूल हवामानाचा परिणाम राज्यातील जवळपास सर्वच भाज्यांवर झाला आहे, असे एपीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
‘व्यवसायात तोटा’
स्वयंपाकघरातील महत्त्वाच्याच भाज्या आणि साहित्याच्या दरातील चढ-उतारामुळे नियोजन बिघडले आहे. आम्हाला मेन्यू कार्डे जपून ठेवावी लागतात. केवळ एका कारणामुळे आम्ही विशिष्ट डिश सर्व्ह करणे थांबवू शकत नाही. भाजीपाल्यांचे भाव वाढले. पण या स्थितीत आम्हाला व्यवसायात तोटा होत आहे, असे उपहारगृह चालवणाऱ्या एका महिलेने सांगितले. तर अति महागाईसारखी परिस्थिती आहे. दर दुहेरी आणि तिप्पट आकड्यांमध्ये वाढत आहेत. भाज्यांच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे घरचे बजेट विस्कळीत होत आहे, असे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.
‘सर्व भाज्यांचे दर जास्त’
सर्व भाज्यांचे दर जास्त आहेत. घाऊक बाजारातील किंमतीपेक्षा आम्ही जवळपास 40-50% जास्त भाव देतो. घाऊक बाजारातून भाजी खरेदी करणे नेहमीच शक्य नसते, असे काही गृहिणींचे म्हणणे आहे. तर इंधन दरवाढीवरून काहींनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. सरकार इंधनाच्या किंमती कमी करत असल्याचे आम्ही ऐकत आहोत. त्यामुळे त्याच्या परिणामांची आम्ही वाट पाहत आहोत, असे काहीजणांचे म्हणणे आहे.