पु्ण्यातील दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक, भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन; नेमकं काय होणार?
भाजपकडून दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्यासाठी मविआतील घटक पक्षांना पत्र दिलं जाणार आहे. या पत्राच्या माध्यमातून बिनविरोध करण्याचं आवाहन केलं जाणार आहे.
पुणे : पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या मतदारसंघात भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी जरी लढत होणार आहे. यात मनसेनंही आता निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेही रिंगणात ? असल्याचं चित्र निर्माण झालंय. भाजपकडून मविआला निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन करायला सुरुवात केली आहे. काँग्रेस मात्र कसबा मतदारसंघात निवडणूक लढवण्यास ठाम आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झालीय. आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली. मतदान जरी 26 फेब्रुवारीला होणार असलं तरी आतापासूनच दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत.
पुण्यातील मध्यवर्ती मतदारसंघ असलेल्या कसबा मतदारसंघात मुक्ता टिळक आमदार होत्या. हा मतदारसंघ बिनविरोध करण्यासाठी भाजपनं प्रयत्न करायला सुरुवात केलीय. मात्र या मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी 2019 ला लढत झाली होती. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेस सोडायला तयार नाही.
काँग्रेसनंही दंड थोपटत आम्ही हा मतदारसंघ निवडून आणू यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र भाजपनं निवडणूक लागली तर तयारी म्हणून बैठकांना सुरुवात केली आहे. कसबा मतदारसंघात भाजपा, विरुद्ध महाविकास आघाडी असं जरी चित्र असलं, तरी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आता निवडणूक लढवण्याची इच्छा राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली.
चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनंही तयारी सुरू केली आहे. मविआत चिंचवडची जागा ही ठाकरे गटाला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे .अजून मविआकडून या दोन्ही जागा कोणी. लढवाव्या हे जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी सगळ्यांनी आतापासूनच कामाला सुरुवात केली आहे.
मात्र या दोन्ही मतदारसंघात गाफील न राहता आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी बैठका घेत तयारी करण्याच्या सूचना दिल्या. दोन्ही मतदारसंघाच्या जबाबदारीचंही वाटप केलं आहे.
चिंचवड मतदारसंघ हा महेश लांडगे यांच्याकडे तर कसबा हा माधुरी मिसाळ यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. मात्र आम्ही आतापासूनच तयारी करतोय असं पालकमंत्री चंद्रकांत पाटीला यांनी जाहीर केलंय.
आता भाजपकडून दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्यासाठी मविआतील घटक पक्षांना पत्र दिलं जाणार आहे. या पत्राच्या माध्यमातून बिनविरोध करण्याचं आवाहन केलं जाणार आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका पाहता ही निवडणूक बिनविरोध होणार की लढत पाहायला मिळणार हे स्पष्ट होईल.