पुणे / रणजित जाधव : मुंबई-पुणे महामार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. या महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आणखी एक अपघात झाला आहे. आज सकाळी साडे सातच्या सुमारास सोमाटने फाट्यावर हा अपघात झाला. मुंबईवरून सोमाटण्याकडे वळताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला अन गाडी थेट डिव्हायडरमध्ये घुसली. यानंतर डिव्हायडरचा अख्खा रॉड कारच्या बरोबर मधून घुसला. यात तरुणी किरकोळ जखमी झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
निल कुसुम आका, सारा अमिताभ मुजावर आणि इवा अमिताभ मुजावर अशी कारमधील तिघांची नावे असून, तिघेही मुंबईतील रहिवासी आहेत. हे तिघे जण मुंबईहून पुण्याडे चालले होते. यावेळी सोमाटणे एक्झिटला चालकाने अचानक यु-टर्न घेतल्याने रोड साईडची डिव्हायडर पट्टी गाडीत घुसली. पण म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती. याचाच प्रत्यय येथे आला.
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडीतील सारा मुजावर या तरुणीच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे. तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र गाडीचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कारने ट्रकला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेत तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही कार येत होती. त्याचवेळी उर्से गावच्या परिसरात ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, त्यातील चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.