पुणे : पुण्यातील पी. जोग शाळा (Jog High School) प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. त्यामुळे पालक संतप्त झाले आहेत. सीबीएससीच्या विद्यार्थ्यांच्या दहावीच्या प्रथम सत्राच्या परीक्षा घेतल्या नाहीत, तरीही निकाल आल्याने आता शाळा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर पालक आक्रमक (Parents aggressive) झाले आहेत. जोग शाळेत पालकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात गोंधळ करत आंदोलन सुरू केले आहे. सीबीएससीच्या (CBSE) पहिल्या सेमिस्टरचे पेपर न घेताच शाळेने निकाल जाहीर केल्याचा आरोप या पालकांनी केला आहे. त्याचारोबर विद्यार्थ्यांना खोटे मार्क देत रिझल्ट लावून 90% मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा केवळ 60% निकाल लावल्याचा आरोप या पालकांनी केला आहे. या सगळ्या संतप्त पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळेला जाब विचारण्यासाठी शाळेच्या आवारात आंदोलन सुरू केला आहे.
सीबीएससीच्या नियमानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर हे दोन टर्ममध्ये होऊन दोन्ही टर्मचे मार्क हे बोर्डाला कळवावे लागतात. पण या शाळेने पहिल्या टर्मचा पेपरच घेतला नाही. त्यामुळे आमच्या पाल्यांचे नुकसान झाले असल्याचा आरोप या पालकांनी केला आहे. विशेष म्हणजे सीबीएससी बोर्ड हा इयत्ता पाचवीपासून द्यायचा असतो. पण या शाळेने या विद्यार्थ्यांना सीबीएससी बोर्ड हा नववीला दिला. त्यामुळेच प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून येत आहे, असा आरोपदेखील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केला आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला. दहावीच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आल्या होत्या. यातील टर्म 1ची परीक्षा 30 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत घेण्यात आली होती, ज्याचा निकाल 11 मार्च रोजी जाहीर करण्यात आला होता. तर 10वीच्या टर्म 2च्या परीक्षा 26 एप्रिल ते 24 मे या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. हा निकाल काल म्हणजेच शुक्रवारी दुपारी 2 वाजता जाहीर झाला. निकालाच्या टॉप लिस्टमध्ये पुण्याने सहाव्या क्रमांकावर स्थान मिळवले. एकीकडे पुण्याने चमकदार कामगिरी केली तर दुसरीकडे अशाप्रकारच्या शाळा त्या यशाला गालबोट लावत असल्याने पालकांना आंदोलन करावे लागत आहे.