पुणे : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Pune District Bank) संचालक पदाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रदीप कंद यांची निवड झाली. या निवडीमुळे पुणे जिल्ह्यातील भाजप (Bjp) कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण असून, या विजयामुळे राज्याच्या राजकारणालाही वेगळी दिशा मिळाली आहे. त्यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही फक्त सुरुवात आहे, आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात अजून उलथापालथ नक्की होईल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी व्यक्त केला. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रदीप कंद यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. “नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राज्यात क्रमांक एकचा पक्ष राहिला. या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दुर्बीण लावून शोधण्याची गरज आहे. पोपटाचा प्राण पुणे ग्रामीण मध्येच आहे. त्यामुळे पक्षाने संकल्प करून बारामतीमधूनच आपण सुरुवात केली. बारामती लोकसभा निवडणूक अतिशय ताकदीने लढलो. त्यासाठी मी स्वतः बारामतीत घर घेऊन राहिलो. काही समीकरणे जुळून आली असती, तर आज वेगळे चित्र पहायला मिळाले असते, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर विश्वासघाताने सरकार गेलं. पण पाच वर्षात भाजपने अतिशय नम्रपणे काम केल्यामुळे विधानसभा निवडणुकीत दोनवेळा शंभरपेक्षा जास्त जागी भाजपला विजय मिळाला. गेल्या विधानसभा निवडणुकीतही युती असूनही भाजपाला १०५ जागांवर विजय मिळाला. “कोविडनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रुपाने आपल्याला संधी मिळाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपण पॅनल उभे केल्याने अनेकांच्या पोटात गोळा आला होता. प्रदीप कंद यांची विरोधकांना जास्तच भिती वाटत होती. पण निकालानंतर प्रदीप कंद यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत दमदार प्रवेश झाला. त्यानंतरही संचालकपदाच्या निवडणुकीत कंद यांना ज्या पद्धतीने विजय मिळाला, त्यामुळे विरोधकांना धक्काच बसला. तेव्हा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही फक्त सुरुवात आहे. आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात अजून उलथापालथ होणार आहे. अनेक निवडणुका होणार असून, त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे. असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
सत्काराला उत्तर देताना प्रदीप कंद म्हणाले की, “पक्षाने आदेश दिल्यावर, कठोर परिश्रम घेणं, ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असते. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने पक्षाने आदेश दिला, त्यामुळे वरिष्ठाचा आदेश प्रमाण मानून काम केले. यात सर्वांची मदत मिळाली, त्यामुळे हा विजय साकारणे शक्य झाले.” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.