पुणे : तुम्ही भारनियमन (Load Shedding) करता, शेतकरी कर्जमाफी नाही, मराठा आरक्षण नाही. अशात लोक म्हणतात, की यांना घालवा. राष्ट्रपती राजवट (President rule) लावा. त्यात चूक काय आहे, असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे वातावरण महाविकास आघाडीकडूनच केले जात आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. आज जे चालले आहे तो हाय व्होल्टेज ड्रामा आहे. या सगळ्याचा भाजपा निषेध करते. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेत. सर्वसामान्य माणसाला जे वाटत आहे, तीच भाजपाची भूमिका आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असे कुणाला वाटत असेल तर त्यात गैर काय? मात्र भाजपा तशी मागणी लावून धरणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तुम्ही वैयक्तिक 10 लोकांची मते घ्या, मग कळेल. कधी रात्र होईल याची लोक वाट पाहायला लागले आहेत. असा टोला त्यांनी लगावला.
राणा यांच्या घरासमोर थांबणे हे पोलिसांचे काम आहे. कार्यकर्ते तिथे कशाला हवेत. राणांनी काय मागणी करावी, हा त्यांचा प्रश्न आहे. तर हनुमान चालिसा म्हणणे यात गैर काय. ते तुमच्या घरी येणार असतील तर तुम्ही त्यांचे स्वागत करायला पाहिजे. तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर तक्रार करावी. फौजफाटा कशाला उभा करता? असा शिवसेनेला सवाल करत अमोल मिटकटी यांनी बाळासाहेबांवर पण टीका केली होती, त्यांची नक्कल केली होती. आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असल्याचा घणाघात त्यांनी शिवसेनेवर केला.
मोहित कंभोज गाडीवर हल्ला, पोलखोल यात्रेवर हल्ला. आम्ही संयमी लोक आहोत. वेळेला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. संजय राऊत यांचा स्तर मातीत गेला आहे. ते संभ्रमित झाले आहेत. काहीही झाले तरी भाजपावर टीका करत आहेत. ऊन वाढले आहेत. त्यालाही ते भाजपालाच जबाबदार धरतील, अशी टीका त्यांनी केली आहे.