पुणे : परमबीरसिंग यांच्या पत्रावरून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात चौकशी केली. त्यानुसार एफआयआर दाखल करून छापे मारले. त्याचप्रमाणे एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या आरोपांच्या संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते शनिवारी (24 एप्रिल) पुण्यात बोलत होते. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपांचीही राष्ट्रीय महिला आयोगाने तातडीने चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली (Chandrakant Patil demand inquiry of Anil Parab and Sanjay Raut).
अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी मग अनिल परब यांच्या का नाही?
चंद्रकांत पाटील म्हणाले, “एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्रावरून उच्च न्यायालयाने तत्कालीन गृहमंत्र्यांविरुद्ध गंभीर आरोपांच्या सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्यानुसार सीबीआयने कारवाई सुरू केली आहे. त्याच प्रकारचे गंभीर आरोप सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याने परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर केले आहेत. अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या 50 कंत्राटदारांकडून 100 कोटी रुपये गोळा करण्याची सूचना दिली होती, असा आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने केलाय.”
“सध्या काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात”
“वाझेला महाविकास आघाडी सरकारनेच निलंबन रद्द करून पुन्हा पोलीस सेवेत आणले होते. त्यावर परब यांनी खुलासा केला असला तरी सीबीआय चौकशी झाल्यानंतरच त्यातील सत्य बाहेर येईल. वाझे याच्या पत्रात घोडावत नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख आहे. घोडावत याचीही सीबीआय चौकशी करावी. काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात आहेत. हे फार दिवस चालणार नाही,” असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.
मुश्रीफ यांचं विधान उच्च न्यायालयाचा अवमान करणारं
चंद्रकांत पाटील म्हणाले, “उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय कारवाई चालू आहे, तरीही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी या कारवाईला भाजपाचे कारस्थान म्हटले आहे. मुश्रीफ यांचे हे विधान उच्च न्यायालयाचा अवमान करणारे आहे. परमबीरसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण गंभीर आहे असे सांगत आधी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा आदेश दिला.”
“… मग यात भारतीय जनता पक्षाचा संबंध कोठे येतो?”
“उच्च न्यायालयाने या प्रकरणात सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्याच्या विरोधात अनिल देशमुख व महाराष्ट्र सरकारने केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले. या सर्वांमध्ये भारतीय जनता पक्षाचा संबंध कोठे येतो? त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी भाजपवर केलेले आरोप हास्यास्पद आहे,” असंही पाटील यांनी सांगितलं.
हेही वाचा :
रोज उठून त्यांचं नाटक चाललंय, केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊतांची चौकशी करावी: चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे?; नाना पटोलेंचा सवाल
चंद्रकातदादा म्हणाले झोप कमी करा, अजित पवार म्हणतात, भाजपचे किती आमदार मला भेटतात हे तपासा
व्हिडीओ पाहा :
Chandrakant Patil demand inquiry of Anil Parab and Sanjay Raut