Chandrakant Patil : जगातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष असूनही यातलं काहीही माहीत नाही, राजकीय नाट्यावर चंद्रकांत पाटलांचं मत
राज्यातील राजकीय नाट्यादरम्यान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटलांना विचारले, त्यावेळी देवेंद्रजींचे दिल्लीला जाणे रुटीन असल्याची सारवासारव त्यांनी केली होती.
पुणे : राज्यात जे काही राजकीय नाट्य सुरू आहे, त्याविषयी काहीही माहीत नाही, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते. या राजकीय नाट्यात भाजपाचा हात नाही, तर आसामचे भाजपाचे मंत्री गुवाहाटीतील हॉटेलमध्ये ज्याठिकाणी शिवसेनेचे बंडखोर आमदार (Shiv Sena’s rebel MLA) आहेत, तेथे काय करत आहेत, असा सवाल विचारला असता, या सर्व घडामोडींबद्दलची माहिती केवळ माध्यमांतूनच माहिती होत असल्याचे आश्चर्यकारक वक्तव्य त्यांनी केले आहे. तर मला टीव्ही पाहायला वेळ नसल्याचेही ते म्हणाले आहेत. तर जे काही होत आहे, ते माध्यमात होत आहे. यामध्ये जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा (Political Party) अध्यक्ष असूनही मला यातील काहीही माहीत नाही. आमचे रुटीन सुरू आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
भाजपाची भूमिका पडद्यामागची?
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे सध्या आसाममध्ये आहेत. तर त्यांच्यासोबत 37हून अधिक आमदार असल्याचा दावा केला जात आहे. एकीकडे राज्यात महाविकास आघाडीवर सत्ता जाण्याची टांगती तलवार आहे. शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही आमदारांवर कारवाईही करण्यात येत आहे. त्यांना नोटीस पाठवली जात आहे. तर दुसरीकडे भाजपा मात्र पडद्यामागून सर्व सूत्र सांभाळत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या अशाप्रकारच्या विधानामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
‘हे तुमच्या आत्ता लक्षात आले’
राज्यातील राजकीय नाट्यादरम्यान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटलांना विचारले, त्यावेळी देवेंद्रजींचे दिल्लीला जाणे रुटीन असल्याची सारवासारव त्यांनी केली होती. तर आज विचारले असता, त्यांच्या दिल्लीच्या अपॉइंटमेंट जास्तच असतात, त्या आत्ताच वाढलेल्या नाहीत. उलट ते तुमच्या आत्ता लक्षात आले, असे माध्यमांनाच त्यांनी ऐकवले. एकीकडे मोहित कंबोज तसेच इतर भाजपाचे नेते बंडखोर आमदारांच्या संपर्कात आहेत. हॉटेलमध्ये गुजरात तसेच आसाम सरकारकडून सुरक्षा पुरवली जात आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांची अशी वक्तव्ये येत आहेत. त्यामुळे भाजपाची नेमकी भूमिका काय, यावरून सध्या राजकीय चर्चा रंगल्या आहेत.