पुणे : भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याविरोधात आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) उद्देशून राजकारण सोडा आणि घरी जाऊन स्वयंपाक करा असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना कडकडीत इशारा दिला आहे. सुप्रिया सूळेंची माफी मागा अन्यथा पुण्यात फिरू देणार नाही, तुम्ही आम्हाला मारलं तर आम्ही गाल पुढे करणारे नाहीत तर हात तोडू, असे रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी बाजवले आहेत. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून अशी भाषा वापरणं योग्य नाही. तुमचं मानसिक स्वास्थ बिघडलं आहे का वयोमानानं? असा सवालही केला आहे. महिला ही स्वयंपाकघरात गेली तर अन्नपुर्णा असते आणि मसनात गेली तर महाकाली असते, तुमच्या सारख्या घाणेरड्या लोकांच्या विचाराचं मुंडन महाकाली केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सुप्रिया सुळेंची माफी मागाच आणि तुम्ही केंद्रात जाऊन इम्पेरीकल डेटा का आणून दिला नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.
तर शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळेंसह देशभरातील महिलांची चंद्रकांत पाटील यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने सध्या महागाईशी लढणाऱ्या देशातील सगळ्या महिलांचा अपमान झाला आहे. भाजपकडून महिलवेर खालच्या पातळीवर नेहमी टीका केली जातेय, असा आरोपही त्यांनी केला आहे.
खासदार सुप्रिया सुळेंबाबत्या वक्तव्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद शहरातील जिजाऊ चौकात चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुप्रिया सुळे यांच्यासह तमाम महाराष्ट्रातील महिला भगिनींची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नसल्याचा सज्जड इशारा यावेळी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी दिला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी महिलांबद्दल अपमानकारक अपशब्द वापरले आहेत, त्यांचा मी जाहीर निषेध करते, स्वयंपाक करणाऱ्या सर्व महिला भगिनीचा अपमान चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तरी त्यांनी समस्त महिला वर्गाची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून जी टीका केलेली आहे, ती महिला वर्गासाठी अपमान कारक असल्याचा आरोप यावेळी यांनी त्यानी केला आहे.