कुठे सूर्य आणि कुठे…? उद्धव ठाकरे हे युगपुरुष मोदी यांची बरोबरी करूच शकत नाही; बावनकुळे यांचा हल्ला
उद्धव ठाकरेंची बुद्धी भष्ट झाली आहे. राहुल गांधी रोज सावरकरांचा अपमान करतायत, मग सोडत का नाही? ढोंगीपणा आहे. उद्धव ठाकरे यांना जर एवढं वाटत असेल तर त्यांनी वेगळं दुकान मांडावं, असं आव्हानच बावनकुळे यांनी दिलं.
इंदापूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगौरव युगपुरुष आहेत. त्यांची आणि मोदींची तुलना होऊच शकत नाही, असं सांगतानाच सावरकरांबाबत एवढाच कळवळा आहे तर उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याचं जाहीर करावं. घ्यावी पत्रकार परिषद आणि सांगावं, असं आव्हानच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष मुख्यमंत्री होते. पण त्यांच्यावर एका पैचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही. भ्रष्टाचाराच्या बाजूला तुम्ही आहात. सत्तेपासून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवणारे तुम्ही आहात. सत्तेतून पैसा मिळवायाचा ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा धर्म आहे, त्यांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलाय. त्यामुळे भ्रष्टाचारावर बोलणं किंवा भ्रष्टाचाराची भाषा करणं तुमच्या तोंडी शोभत नाही. तुम्ही आत्मपरीक्षण करा. तुम्ही भ्रष्टाचारा केलाय. तुम्ही भ्रष्टाचारी आहात. आम्ही नाही आणि तुमच्या बाजूला जे बसलेत तेही भ्रष्टाचारी आहेत, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
कुठं सूर्य आणि कुठे…
मोदींच्या नावाने मते मागवून दाखवा? माझ्या वडिलांच्या नावाने मते का मागताय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कुठं सूर्य आणि कुठे तुम्ही? ते मोदींवर बोलतात. मोदींची बरोबरी तरी करू शकतात का? विश्वगौरव, युगपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी उद्धव ठाकरे यांची तुलनाच होऊ शकत नाही. कशाला वल्गना करता? बघा तुम्ही 2024 काय होतंय ते पाहा?, असा इशाराच बावनकुळे यांनी दिला.
उरले सुरलेही येतील
खरंतर माझ्या कुळाचा उल्लेख करुन त्यांना आनंद मिळतो आहे. त्यांनी खुशाल माझ्या कुळाचा उल्लेख करावा. पण पुढे काय होतंय ते बघाच. त्यांच्याकडे जे उरले सुरले आहेत, तेही आमच्याकडेच येतील. आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहोत. हिंदुत्वासाठी काम करत आहोत. तुम्ही पळपुटे आहात. आम्ही तुमच्या टीकेला भीक घालत नाही, असंही ते म्हणाले. भाजपचे सरकार 9 वर्षांपासून केंद्रात आहे एक तरी भ्रष्टाचाराचा आरोप दाखवा. उद्धव ठाकरेचा एकच आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, उद्धव ठाकरेच भ्रष्टाचारी आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.