जिल्हा परिषद शाळेच्या आवारात चिकन आणि दारु पार्टी! पुण्याच्या खेड तालुक्यातील लाजिरवाणा प्रकार
खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात काही तळीरामांनी चिकन आणि दारुची पार्टी केल्याचं समोर आलंय.
पुणे : शाळेला ज्ञानमंदिर असं संबोधलं जातं. या मंदिरात ज्ञानार्जन केलं जातं. पण पुण्याच्या खेड तालुक्यात अशाच एका ज्ञानमंदिरात काही तळीरामांनी अत्यंत लाजिरवाणा प्रकार केलाय. खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात काही तळीरामांनी चिकन आणि दारुची पार्टी केल्याचं समोर आलंय. या घटनेबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी तक्रार केल्यानंतर खेड पोलिसांनी चार तळीरामांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतलंय. (Chicken and liquor party in Zilla Parishad School Premises in Pune District)
शाळेच्या आवारात 4 तळीरामांनी चिकन आणि दारु पार्टी केल्याची तक्रार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांनी खेड पोलिसांकडे केली. त्याबाबत गुन्हा दाखल करुन घेत पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली आहे. अनुप टाकळकर, मयूर टाकळकर, निखिल येवले, राजेश पवार अशी गुन्हा दाखल झालेल्या तळीरामांची नावं आहेत. टाकळकरवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेत गेल्या काही दिवसांपासून दारु, चिकन आणि मटणाच्या पार्टी सुरु होत्या, अशी माहिती काही ग्रामस्थांनी दिलीय.
दारुच्या रिकाम्या बाटल्या आणि प्लास्टिक ग्लासचा खच
महत्वाची बाब म्हणजे टाकळकरवाडीची शाळा एक आदर्श शाळा आहे. या शाळेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या शाळेने गावात अनेक हुशार विद्यार्थी घडवले. पण याच शाळेत गावातीलच काही तळीरामांनी लॉकडाऊन आणि सुट्ट्यांचा फायदा घेत आपल्या अड्डा बनवला होता. शाळेच्या आवारात चिकन, मटण आणि दारुच्या पार्ट्या होत होत्या. चिकन आणि मटण शिजवण्यासाठी तळीरामांनी विटांची चूलही मांडली होती. पोलिसांनी 4 तळीरामांना ताब्यात घेतल्यानंतर शाळेच्या परिसरात दारुच्या रिकाम्या बाटल्या, दारु पिण्यासाठी वापरलेले प्लास्टिकचे ग्लास, तसेच विविध खाद्यपदार्थ्यांचे प्लास्टिकचे वेस्टन दिसून आले.
इतर बातम्या :
बारामती पोलिसांकडून सिनेस्टाईल पाठलाग; थरार नाट्यानंतर ट्रकसह चालक ताब्यात
सोनू…तुझ्यावर कुणाचाच भरोसा नाय, 13 लग्न, 13 मुलांना लुटलं, सोनू शिंदेची टोळी अखेर सापडली!
Chicken and liquor party in Zilla Parishad School Premises in Pune District