पुणे : पुणे रेल्वे विभाग आणि होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन (HFCF) यांनी संयुक्तपणे पुणे रेल्वे स्थानक याठिकाणी मुलांसाठी चाइल्ड फ्रेंडली रूम (Child friendly room) तयार केली आहे. ही जागा मुलांना आरामदायक वाटेल याची खात्री करण्यासाठी डिझाइन केलेली खोली आहे. त्यात लहान पॅन्ट्री व्यवस्था आणि लायब्ररी आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही सुविधा अडचणीत असलेल्या मुलांना समुपदेशनदेखील करणार आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी नुकतेच पुणे रेल्वे स्थानकाच्या (Pune railway station) प्रवेश/एक्झिट गेट क्रमांक 1 जवळ असलेल्या बालस्नेही जागेचे उद्घाटन केले. यावेळी स्थानिक पोलीस अधिकार्यांना बालस्नेही पाच जॅकेट सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रमाला एचएफसीएफच्या प्रमुख कॅरोलिन ऑडॉयर डी वाल्टर आणि पुणे रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला एचएफसीएफच्या प्रमुख कॅरोलिन ऑडॉयर डी वाल्टर आणि पुणे रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बाल-अनुकूल कक्षाचे उद्घाटन केल्यानंतर शर्मा म्हणाल्या, की केवळ पायाभूत सुविधांचा विकास करून चालणार नाही तर समाजातील प्रत्येकाने बाल-अनुकूल मानसिकता ठेवण्यासाठी आपली भूमिका बजावली पाहिजे.
लैंगिक आणि कामगार शोषणासाठी भारतात हजारो मुले बेपत्ता होतात किंवा त्यांची तस्करी होते. या मुलांची ने-आण करण्यासाठी रेल्वे बहुतेकदा सर्वात सोयीस्कर मार्ग आहे. रेल्वे स्थानकांवर येणारी अनेक मुले गंभीर हिंसाचार किंवा अत्याचाराला बळी पडतात, असे मत वाल्टर यांनी मांडले.
पुढे, पालक, मुले, सामान्य प्रवासी आणि समाज या सर्वांना मुलांना होणाऱ्या हिंसाचाराची जाणीव व्हावी आणि आवश्यकतेनुसार ते सुरक्षा जाळी म्हणून काम करू शकतील याची खात्री करण्यासाठी संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरात जागरूकता उपक्रम राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.