शरद पवारांबाबतच्या वादग्रस्त विधानप्रकरणी सदाभाऊ खोतांच्या विरोधात तक्रार दाखल
Complaint filed against Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या. आता सदाभाऊ खोत यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. वाचा सविस्तर...
माजी मंत्री, महायुतीतील नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. शरद पवारांना त्यांच्या तोंडासारखा महाराष्ट्र करायचा आहे का? असं सदाभाऊ खोत यांनी काल जतच्या सभेत म्हटलं आणि त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. हे वादग्रस्त विधान सदाभाऊ खोत यांना भोवलं आहे. खोत यांच्याविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. माजी आमदार विलास लांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. शरद पवारांबाबतचं असं विधान खपवून घेणार नाही, असं विलास लांडे म्हणालेत.
विलास लांडे यांनी काय म्हटलं?
सदाभाऊ खोत हे भाजपने पाळलेलं कुत्रं आहे. त्यांचे वक्तव्य निंदनीय आहे. शरद पवार हे एक मोठे नेते आहेत. त्यांच्याबाबत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेलं वक्तव्य अशोभनीय आहे. खोत यांच्या पाठीमागे बोलावता धनी कोण आहे? भाजप जे पळालेलं एक कुत्र आहे. ते भुंकत असतं. म्हणून ते शरद पवार यांच्यावर बोलत आहेत. त्यांचं वक्तव्य हे निंदनीय आहे. सदाभाऊ खोत यांना फिरू देणार नाहीत. आमच्या पक्षाला लुटारू म्हणणारे सदाभाऊ हे स्वत: लुटारू आहेत. त्यांनी अस बोलण हास्यास्पद आहे. सदाभाऊ खोत यांच्यावर कारवाई करावी. नेता कुठल्याही पक्षाचा असावा त्यावर बोलताना तारतम्य ठेवून बोलावं, असं विलास लांडे यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळांनी सुनावलं
महायुतीतील मंत्री छगन भुजबळ यांनीही सदाभाऊ खोत यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. सदाभाऊ खोत यांचं विधान मला ते अजिबात आवडलेले नाही. राजकारणावर बोलावं. पण शारिरिक व्यंगावर बोलू नये. मला त्या विधानाचं दुःख झालं आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात हे होऊ नये. ठीके त्यांची चूक झाली, पण त्यांचं असं वक्तव्य नको होतं, असं भुजबळ म्हणालेत.
सदाभाऊ खोत यांचं विधान काय?
अरे पवारसाहेब, तुमच्या चिल्ल्या पिल्ल्यांनी कारखाने हाणले. बँका हाणल्या. सूत गिरण्या हाणल्या. पण पवाराला मानावं लागेल. एवढं हाणलं तरी सुद्धा भाषणात आता म्हणतंया, मला महाराष्ट्र बदलायचाय. मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. कसला तुला चेहरा बदलायचाय? कसला चेहरा? तुला तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का?, असं विधान सदाभाऊ खोत यांनी काल केलं. गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी जत विधानसभा मतदारसंघात काल झालेल्या सभेतसदाभाऊ खोत यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. आता त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे.