महाविकास आघाडीची मोठी खेळी, पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांना उतरवणार?; भाजपचं टेन्शन वाढलं
खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोग या संदर्भातील घोषणा करणार आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये उमेदवार चाचपणी सुरू झाली आहे.
पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं नुकतच निधन झालं. बापट यांचं निधन झाल्याने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. येत्या सहा महिन्यात या जागेवर निवडणूक होणार आहे. त्यामुळे या जागेसाठी भाजपमध्ये चुरस निर्माण झाली आहे. सध्यातरी भाजपमध्ये पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तीन नावांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजप कुणाच्या गळ्यात निवडणुकीची माळ टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. धंगेकर यांना उमेदवारी दिल्यास पुण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापणार असल्याचं चित्रं आहे.
पुणे लोकसभा पोटनिवडणूकीच्या उमेदवारीवरून भाजपात खल सुरू झाला आहे. गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे या तीन नावांवर सध्या भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. संजय काकडे आणि मुरलीधर मोहोळ यांना राजकीय अनुभव मोठा आहे. तर स्वरदा बापट या नवख्या आहेत. त्यामुळे भाजप कुणाला तिकीट देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपने कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांना डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. त्याचा मोठा फटका भाजपला बसला. गेल्या 20-22 वर्षापासून कसब्यावर वर्चस्व असलेल्या भाजपला या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. टिळक कुटुंबीयांना डावलल्याने मतदारांनी हा रोष व्यक्त केला होता. त्याचीच पुनरावृत्ती पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत होऊ नये म्हणून भाजपने अत्यंत सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेसची खेळी
एकीकडे भाजपमध्ये स्वरदा बापट, मुरलीधर मोहोळ आणि संजय काकडे यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडी आमदार रवींद्र धंगेकरांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे लोकसभेची सीट ही काँग्रेसकडे येते. त्यामुळे काँग्रेसकडून या जागेवर धंगेकर यांना उभं करण्याची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेसकडे पुण्यात पाहिजे तसा चेहरा नाहीये. धंगेकर हे कसब्यात जायंट किलर ठरले आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडल्याने त्यांची राज्यभर चर्चा झाली. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन भाजपचा डाव उलथवून लावण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे.
अहवाल सादर
दरम्यान, एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झाल्यास सहा महिन्याच्या आत त्या मतदारसंघात पोटनिवडणुका घेतात. त्यानुसार पुणे लोकसभेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. पुणे लोकसभेची जागा रिक्त झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग लवकरच या निवडणुकीची घोषणा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. साधारणपणे ऑगस्टपर्यंत ही निवडणूक होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.