मोदींना घालण्यात येणाऱ्या फेट्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, काँग्रेसचा फेट्याला विरोध
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला येत असून मोदींच्या या दौऱ्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पुणे दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महापालिकेकडून विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा तयार करून घेतला आहे.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला (pune metro) येत असून मोदींच्या या दौऱ्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पुणे दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महापालिकेकडून (pune corporation) विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा तयार करून घेतला आहे. पण त्या फेट्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करण्यात आलेला आहे. त्याला काँग्रेसने विरोध केला आहे. राजमुद्रा ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्याचा कुठेही वापर करणं योग्य नाही, असं सांगत याप्रकारातून मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असल्याचं दाखवण्याचा प्रकार होत आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे. मोदींना हा फेटा घालण्यात येऊ नये, असं आवाहनही काँग्रेसने केलं आहे.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी हा विरोध दर्शविला आहे. राजमुद्रा ही महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असून, महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपतर्फे सातत्याने अपमान सुरु आहे. राजमुद्रा असलेला फेटा वापरून भाजपने हेतुपुरस्सर या अपमानाची मालिका सुरु ठेवल्याचे दिसते. पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून काँग्रेसचा फेट्यावर राजमुद्रा वापरण्यास विरोध आहे. तरी सदरचा फेटा घालण्यात येऊ नये, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.
मोदींच्या हस्ते मेट्रोचं लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी पुणे येथील विमानतळावर पोहचतील. तिथं त्यांचा स्वागत समारंभ झाल्यानंतर ते पुणे महानगरपालिकेत उभारण्यातआलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी 11 वाजता पोहोचतील. त्यानंतर 11.30 वाजता पुणे मेट्रोचं उद्घाटन करून ते गरवारे स्टेशन पासून मेट्रोने प्रवास करणार आहेत. एमआयटी कॉलेजमध्ये विविध विकास योजनांचं उद्घाटन झाल्यानंतर तिथं त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. सभा संपल्यानंतर आर के लक्ष्मण गॅलरीचं उद्घाटन ते दीड वाजता करतील. त्यानंतर तीन वाजता ते पुण्यातून रवाना होतील अशी माहिती प्राथमिक माहिती आहे.
असा असेल मोदींचा दौरा
- सकाळी 10 वाजून 25 मिनीटांनी मोदींचं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन
- त्यानंतर एमआय 17 या हेलिकॉप्टरनं शिवाजीनगरच्या कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आगमन
- 11 वाजता महापालिकेत आगमन होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करतील
- 11 वाजून 15 मिनीटांनी ते गरवारे महाविद्यालय येथे मेट्रो उद्घाटनासाठी पोहोचतील
- उद्घाटन करून 11 वाजून 55 मिनिटांनी मेट्रो प्रवास करून आनंदनगर मेट्रो स्टेशनवर उतरतील. त्यानंतर एम आयटीला जातील
- 12 ते 1 विविध विकासकामांच ते उद्घाटन करतील आणि सभेला संबंधित करतील
- 1 वाजून 35 मिनिटांनी ते हेलिकॉप्टरनं सिम्बायोसिस महाविद्यालय लवळे इथे जातील आणि त्यानंतर महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील
- 2 वाजून 55 मिनीटांनी हेलिकॉप्टरनं विमानतळावर आगमन होईल
- 3 वाजून 25 मिनीटांनी विमानानं दिल्लीला रवाना होतील
संबंधित बातम्या: