Congress protest : महागाईविरोधात केंद्र सरकारवर हल्लाबोल; जीएसटीच्या विरोधात आंदोलन करत काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका
राज्यात काँग्रेसचे महागाईविरोधात आंदोलन आहेत. त्यासोबतच नॅशनल हेरॉल्डप्रकरणी राहुल गांधींची ईडी चौकशी, सोनिया गांधींची ईडी चौकशी यालाही विरोध केला जात आहे. त्याविरोधातही काँग्रेसचे देशभर आंदोलन सुरूच आहे.
पुणे : पुण्यात महागाईविरोधात (Inflation) काँग्रेस आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली असून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. केंद्र सरकारने वाढवलेल्या जीएसटी कराच्या विरोधात काँग्रेस आक्रमक (Congress protest) झालेली पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना त्याचबरोबर इंधन दरवाढ. महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना तसेच जीवनावश्यक वस्तूंवरील भरमसाठ वाढवलेल्या जीएसटीविरोधात काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde), काँग्रेस गटनेते आबा बागुल, काँगेस महिला आघाडीच्या कमल व्यवहारे, संगीता तिवारी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले. डंडा लेके हल्लाबोल, जुता लेके हल्लाबोल, जोर से बोल हल्लाबोल… अशा घोषणांनी सातारा रोड, सिटी प्राइड चौकाचा परिसर दणाणून गेला होता.
दरवाढीचा बोजा
महागाईच्या विरोधात केवळ राज्यातच नाही, तर देशभरात काँग्रेस आंदोलन करत आहे. राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढला जाणार आहे. पंतप्रधान भवनालाही घेराव घालण्याचा काँग्रेसच्या आंदोलनाचा भाग असणार आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंवर केंद्र सरकारने जीएसटी लावला आहे. अन्नधान्यासह 5 टक्के जीएसटी विविध वस्तूंवर लावण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. तर व्यापारीदेखील या जीएसटीला विरोध करत आहेत. या वाढलेल्या जीएसटीमुळे ग्राहकांवर अतिरिक्त 8 ते 10 टक्के दरवाढीचा बोजा पडणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या वतीने विरोध प्रदर्शन काँग्रेसकडून केले जात आहे.
राहुल गांधीही आक्रमक
राज्यात काँग्रेसचे महागाईविरोधात आंदोलन आहेत. त्यासोबतच नॅशनल हेरॉल्डप्रकरणी राहुल गांधींची ईडी चौकशी, सोनिया गांधींची ईडी चौकशी यालाही विरोध केला जात आहे. त्याविरोधातही काँग्रेसचे देशभर आंदोलन सुरूच आहे. हब्बर सिंग टॅक्स असे म्हणत राहुल गांधींनीही यापूर्वी अनेकवेळा जीएसटीला विरोध केला. तर केंद्र सरकारच्या विरोधात बोलल्याने सुडाच्या भावनेतून राहुल गांधींवर ईडी लावल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र नरेंद्र मोदी काहीही करो, आम्ही मागे हटणार नाही. नरेंद्र मोदींना घाबरत नाही, असे आव्हान राहुल गांधी यांनी नुकतेच दिले होते.