Bhagat Singh Koshyari : स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींसोबतचं इतरांचंही योगदान, गांधींचं एकतर्फी समर्थन करू नका, राज्यपालांचे पुण्यात वादग्रस्त वक्तव्य
सध्या फक्त पैसा आणि सत्ता यासाठी सर्व राजकारणी आणि जनता काम करत असल्याचं दिसतं आहे. यामुळेच काही राज्यातील मंत्री आणि मुख्यमंत्री जेलमध्ये गेले असल्याचंही राज्यपालांनी सांगितले.
पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर (Rajgurunagar) येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हुतात्मा राजगुरू यांच्या 114 व्या जयंती सोहळ्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधींसोबत इतर क्रांतिकारकांचेही (Freedom Revolutionaries) योगदान आहे. मात्र आपण फक्त गांधीजींचेच एकतर्फी समर्थन करू नका, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजगुरुनगर येथे केलं आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचा इतिहास नवी पिढी शिकत नसल्याची खंतही यावेळी राज्यपालांनी (Governor) व्यक्त केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. संपत्ती दिली. मात्र हल्ली देशप्रेम कमी होत चालले आहेत. देश आहे तर आपण आहोत. हे सांगायला राज्यपाल विसरले नाहीत.
रस्त्यांवरील खड्ड्याबाबत व्यक्त केली नाराजी
सध्या फक्त पैसा आणि सत्ता यासाठी सर्व राजकारणी आणि जनता काम करत असल्याचं दिसतं आहे. यामुळेच काही राज्यातील मंत्री आणि मुख्यमंत्री जेलमध्ये गेले असल्याचंही राज्यपालांनी सांगितले. देशाला स्वातंत्र्य मिळाले. विकास झाला. मात्र विकास होत असताना कामाच्या दर्जाबद्दल नाराजी व्यक्त करत राज्यपालांनी थेट सध्यस्थितीत भेडसावणा-या खड्डे असलेल्या रस्त्यांचेच उदाहरण दिलं. आधी खड्डा बनतो. मग रस्ता होतो. त्यासाठी नागरिकांनीच यापुढे क्रांतिकारक बनायला हवं असं आवाहन केलं. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हुतात्मा राजगुरू यांच्या 114 व्या जयंती सोहळ्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यपाल नेमकं काय म्हणाले
देशाला स्वातंत्र्य मिळाले. यासाठी महात्मा गांधींसोबत इतर क्रांतिकारकांचेही मोठे योगदान आहे. आपण फक्त गांधीजींचेच एकतर्फी समर्थन करतो. ते योग्य नव्हे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिलं. क्रांतिकारकांचा इतिहास नवी पिढी शिकत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. काहींनी आपली संपत्ती दिली. परंतु, हल्ली देशप्रेम कमी होत असल्याचं दिसून येतं.