NDA : पुण्यात एनडीएचा दिमाखदार दीक्षांत सोहळा, अभिमन्यू चौधरीला गोल्ड तर अरविंद चव्हाणला सिलव्हर मेडलचा सन्मान
या संचलनात तिनही वर्षांतील 907 कॅडेट्सनी भाग घेतला होता. यांच्यासोबत भूटान, श्रीलंका, अफगाणिस्तान, म्यानमार, व्हिएतनाम, मालदीव या देशांतील जवळपास 19 कॅडेट्सनीदेखील हे प्रशिक्षण पूर्ण केले.
पुणे : पुण्यातील खडकवासल्यात आज एनडीएमध्ये 142वा दीक्षांत समारंभ (Convocation ceremony) उत्साहात पार पडला. 907 कॅडेट्सनी यामध्ये सहभाग घेतला होता. अभिमन्यू चौधरी याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने गोल्ड मेडल प्राप्त केले तर अरविंद चव्हाण याला सिल्व्हर मेडल मिळाले. नितीन शर्मा याला ब्राँझ मेडल प्रदान करण्यात आले तीन वर्षांतला अनुभव चांगला होता. खूप काही शिकता आले. आर्मीत जायचे आधीपासूनच ठरले होते. त्यामुळे सेवेत जाता येत असल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया या तिघांनी दिली. या समारंभाला एअर मार्शल चिफ विवेक चौधरी यांनी हजेरी लावली होती. त्यांच्यासह एनडीएचे (NDA) प्रमुख व्हाइस अॅडमिरल अजय कोचर, मुख्य प्रशिक्षक मेजर जनरल संजीव डोग्रा, लेफ्टनंट जनरल जे. ए. नैन आदी उपस्थित होते. विवेक चौधरी यांनी सर्व कॅडेट्सचे (Cadets) कौतुक करत पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रत्येकाच्या उरात आत्मविश्वास
907 कॅडेट्सचा सहभाग असलेल्या या दीक्षांत समारंभात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कॅडेट्सनी पांढरीशुभ्र वस्त्रे परिधान केली होती. देशभक्तीपर गीते यावेळी ऐकायला मिळाली. तसेच या कॅडेट्सनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केलेले संचलन उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. प्रत्येकाच्या उरात आत्मविश्वास भरलेला दिसून आला. तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर देशसेवेसाठी हे कॅडेट्स सज्ज झाले आहेत. सुखोई लढाऊ विमानांची प्रात्यक्षिके लक्षवेधक ठरली.
इतर देशांतील कॅडेट्सही सहभागी
या संचलनात तिनही वर्षांतील 907 कॅडेट्सनी भाग घेतला होता. यांच्यासोबत भूटान, श्रीलंका, अफगाणिस्तान, म्यानमार, व्हिएतनाम, मालदीव या देशांतील जवळपास 19 कॅडेट्सनीदेखील हे प्रशिक्षण पूर्ण केले. अभिमन्यू सिंग राठोड, अरविंद चौहान आणि नितीन शर्मा या तीन कॅडेट्सचे विशेष अभिनंदन करण्यात आले. एअर मार्शल चिफ विवेक चौधरी यांनी या सर्व कॅडेट्सचे कौतुक केले तसेच त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छादेखील दिल्या.
पाहा नेत्रदीपक संचलन
एनडीएविषयी…
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीए ही महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थ्यांमधून भारतीय संरक्षणदलांतील अधिकारी घडवण्याकरिता निर्मिलेली पुण्यातील सैनिकी प्रशिक्षणसंस्था आहे. येथे भूदल, वायूदल व नौदल या तिन्ही दलांसाठी संयुक्त प्रशिक्षण दिले जाते. 1954 साली प्रबोधिनीची स्थापना झाली. येथे प्रवेश देण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यू.पी.एस.सी.) वर्षांतून दोन वेळा परीक्षा घेण्यात येते.