पुणे : पुणे रिंग रोड (Pune ring road) आणि पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (Nashik high speed railway) जमीन संपादनाच्या विरोधात शेतकरी (Farmers) आक्रमक झाले आहेत. विरोध तीव्र असल्याने शेतकऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 24 जणांना खेड पोलिसांनी अटक केली आहे. यात 12 महिलांचाही समावेश आहे. पुणे रिंग रोड आणि पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या जमीन संपादनाला तीव्र विरोध आहे. या प्रकल्पाचा विरोध करत खेड तालुक्यातील 12 गावच्या शेतकऱ्यांसह महिलांनी खेड उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढला, बागायती जमिनी वगळून तसेच जमिनीला योग्य बाजारभाव मिळाला तरच जमिनीची मोजणी करावी, या मागणीसाठी चार तासांच्या मोर्चात शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात आपला मोर्चा काढला.
राजगुरुनगर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांची धरपकड करत लाठीमार केला. यामध्ये 24 शेतकऱ्यांसह महिलांना अटक करण्यात आली आहे. याबरोबरच आंदोलकांवर शासकीय कामात अडथळा आणल़्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
आळंदी, चिंबळी, मोई, मरकळ परिसरातील शेतकरी भूमिहिन होत असताना तुटपुंज्या शेतीवर प्रकल्प कशासाठी, असा सवाल या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच केला आहे. ‘पुणे नाशिक रेल्वे, रिंग रोड हटावा शेतकरी बचाव’ असा नारा देत प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आंदोलनही पुकारले होते. रक्त सांडले तरी प्रकल्पाला जमिनी देणार नाही, अशी भूमिका आंदोलक घेत आहेत.