Sinhagad : सिंहगड बंद असल्याची हौशी पर्यटकांना कल्पनाच नाही; गडाच्या पायथ्यावरूनच फिरावं लागलं माघारी
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दि. 14 जुलै ते 17 जुलै 2022 या कालावधीपर्यंत सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश जारी केले. मात्र याची हौशी पर्यटकांना कल्पना नसावी, त्यामुळे त्यांच्या उत्साहावर विरजण पडले.
पुणे : पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही आज रविवारच्या दिवशी अनेक पर्यटक सिंहगडावर (Sinhagad) जाण्यासाठी निघाले होते. मात्र रस्त्यातूनच त्यांना माघारी लावण्यात आले. आज रात्री 12पर्यंत ही बंदी असणार आहे. उद्यापासून पर्यटन स्थळे खुली होण्याची शक्यता आहे. मात्र आज रविवारीचा मुहूर्त साधत गेलेल्या पर्यटकांच्या (Tourist) पदरी मात्र निराशा पडली आहे. कारण पावसाचा जोर कमी झाला होता. त्यामुळे हजारो पर्यटक गडाच्या दिशेने निघाले होते. मात्र सिंहगडाच्या पायथ्याशी गोळेवाडी येथे वन विभागाच्या तपासणी नाक्यावरून पर्यटकांना निराश होऊन परतावे लागले. गड बंद असल्याचे पर्यटकांना सांगण्यात आले. मात्र दुसरीकडे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या (Forest department) मात्र नाकी नऊ येत होते. अनेक पर्यटक लांबून आले होते. दुसरीकडे गड बंद असल्याची माहिती दर्शविणारा फलक लावलेला नसल्याने कर्मचाऱ्यांचीही सांगता सांगता दमछाक होत होती.
उत्साहावर विरजण
मागील दहा-बारा दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस कुठे कमी झाला आहे. मात्र या मुसळधार पावसामुळे घाट परिसरात मोठ्या दुर्घटना पाहायला मिळाल्या. या आठवड्यातील पावसामुळे सिंहगडावरदेखील दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. तत्पूर्वी वनविभागाने सिंहगड परिसर पर्यटकांसाठी बंद ठेवावा, अशी विनंत जिल्हा प्रशासनाला केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दि. 14 जुलै ते 17 जुलै 2022 या कालावधीपर्यंत सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश जारी केले. मात्र याची हौशी पर्यटकांना कल्पना नसावी, त्यामुळे त्यांच्या उत्साहावर विरजण पडले.
पावसाचा जोर ओसरला
आज पावसाने काहीशी विश्रांती घेतली. कालपासून पावसाचा जोरही ओसरला आहे. हीच संधी साधून पर्यटक सिंहगडाकडे निघाले होते. तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी गोळेवाडी येथील तपासणी नाक्यावर हजर होते. पर्यटकांना थांबवत त्यांना परत जाण्याची विनंती करताना सकाळी दिसून येत होते. काही पर्यटक तर अनावश्यक चौकशी करून गडावर जाण्याचा हट्ट करतानाही दिसून आले. दरम्यान, आज मध्यरात्रीपर्यंत हा आदेश असून उद्यापासून पर्यटनस्थळे खुली होण्याची शक्यता आहे.