Pune crime : हँडी लोन अॅप डाऊनलोड करणं पडलं महागात; अश्लील फोटो मॉर्फ करून पुण्यातल्या तरुणाची सायबर चोरांनी केली बदनामी
गुगल प्ले स्टोअरवरून तरुणाने हँडी लोन अॅप डाऊनलोड केले होते. त्याने कोणतेही कर्ज घेतलेले नव्हते, तरीही त्याला कर्ज फेडण्यासाठी धमकाविले जात होते. त्याचे मैत्रिणीसोबतचे फोटो मॉर्फ करून त्याच्या नातेवाईकांना पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आता उघड झाला आहे.
पुणे : अश्लील फोटो मॉर्फ (Photo morphing) करून बदनामीची धमकी देणाऱ्यांचा पुण्यात सुळसुळाट झाला आहे. ऑनलाइन अॅप डाउनलोड करायला सांगून नंतर स्वत:च्या जाळ्यात ओढत पैशांची मागणी केली जाते. अशा सायबर (Cyber crime) चोरांनी पुण्यात धुमाकूळ घातला आहे. त्वरीत ऑनलाइन कर्ज देण्याचे आमिष दाखवून अॅप डाऊनलोड करायला सांगितले जाते. पैसे फेडल्यानंतरही सातत्याने पैशांची मागणी केली जाते. त्यांनी नकार दिला तर त्यांच्या मोबाइलमधील फोटो मॉर्फिंग करून ते नग्न स्त्री-पुरुषांसोबत जोडून ते व्हायरल करण्याची धमकी दिली जात आहे. सध्या अशाच प्रकारच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. हँडी लोन अॅप (Handy loan app) डाऊनलोड करणाऱ्या तरुणाला सध्या मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे त्याने कोणतेही कर्ज घेतले नव्हते.
गुगल प्लेवरून डाऊनलोड केले होते अॅप
गुगल प्ले स्टोअरवरून तरुणाने हँडी लोन अॅप डाऊनलोड केले होते. त्याने कोणतेही कर्ज घेतलेले नव्हते, तरीही त्याला कर्ज फेडण्यासाठी धमकाविले जात होते. त्याचे मैत्रिणीसोबतचे फोटो मॉर्फ करून त्याच्या नातेवाईकांना पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आता उघड झाला आहे. पोलिसांनी याबाबत सांगितले, की संबंधित तरुणाने 31 मे रोजी हँडी लोन अॅप डाऊनलोड केले होते. मात्र कर्ज कोणतेही घेतले नव्हते. दोन जूनरोजी त्याला फोन करून धमकावण्यात आले. तुम्ही कर्ज घेतले आहे. ते भरा नाहीतर तुमच्या विरुद्ध कारवाई करू. व्हाट्सअॅप ग्रुपवरून नातेवाईक आणि मित्रांना अश्लील फोटो पाठवून बदनामी करू, अशी धमकी देण्यात आली होती.
बदनामी झाल्यानंतर घेतली पोलिसांत धाव
एवढेच नाही, तर आधार कार्ड, पॅन कार्ड ब्लॉक करू, असेही या सायबर गुन्हेगारांनी तरुणाला धमकावले होते. वारंवार हे धमकीचे फोन येत होते. कर्जच घेतले नसल्यामुळे ते भरण्याचा प्रश्नच येत नाही, असे संबंधित तरुणाने त्यांना सांगितले. यानंतर 9 जूनरोजी तरुणाच्या दोन्ही व्हाट्सअॅप क्रमांकावर एक फोटो रिसीव्ह झाला. अश्लील नग्न पुरुषाच्या फोटोला जोडलेला तो फोटो होता. त्या तरुणासह त्याची पत्नी, नातेवाई, मित्र-मैत्रिणी यांच्या व्हाट्सअॅपवरही हे फोटो पाठवण्यात आले. त्यांच्या पत्नीच्या मैत्रिणीला फिर्यादीचा नग्न फोटो मॉर्फ करून जोडण्यात आला होता. यासर्व प्रकारानंतर बदनामी झाल्याने अखेर संबंधित तरुणाने पोलिसांत धाव घेतली आणि घडलेल्या प्रकाराविरोधात तक्रार दाखल केली.