दत्तात्रय भरणेंचा हर्षवर्धन पाटलांना तिसरा धक्का, पंचायत समिती सभापतींसह कट्टर समर्थक फोडला
दत्तात्रय भरणे यांनी आज इंदापूर (Indapur) तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांना आणखी एक धक्का दिला आहे.
पुणे : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne ) हे सध्या ॲक्शन मोडमध्ये असल्याचं दिसून येत आहे. दत्तात्रय भरणे यांनी आज इंदापूर (Indapur) तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांना आणखी एक धक्का दिला आहे. इंदापूरच्या विद्यमान पंचायत समिती सभापती स्वाती शेंडे आणि त्यांचे पती बापुराव शेंडे राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार आहेत. दत्तात्रय भरणे यांनी यासंदर्भात एका कार्यक्रमात ही घोषणा केली. दत्तात्रय भरणे यांच्याकडून हर्षवर्धन पाटील यांच्या गटाला खिंडार पाडण्याच काम सुरु असल्याचं देखील यानिमित्तानं समोर आलं आहे. तर, सोमवारी (21 मार्चला) इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी-बावडा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य श्रीमंत ढोले (सर) यांना राष्ट्रवादीत आणण्यात दत्तात्रय भरणे यशस्वी झाले होते.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
स्वाती शेंडे , बापुराव शेंडे आणि श्रीमंत ढोले यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला असून एप्रिल महिन्याच्या 3 तारखेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. दत्तात्रय भरणे यांनी सुरु ठेवलेल्या पक्षविस्ताराच्या कामगिरीमुळं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे स्वतः इंदापूरला येत मोठी जंगी सभा घेणार आहे. यावेळी शेतकरी मेळावा देखील ठेवण्यात आला आहे.
दत्तात्रय भरणे यांचा हर्षवर्धन पाटील यांना तिसरा धक्का
दत्तात्रय भरणे यांनी यापूर्वी हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू प्रशांत पाटील यांना राष्ट्रवादीत आणून धक्का दिला होता. त्यानंतर भरणे यांनी सोमवारी पाटील यांना बालेकिल्ल्यात श्रीमंत ढोले यांच्या निमित्तानं दुसरा धक्का दिला होता. आता बापुराव शेंडे यांच्या पक्षप्रवेशानिमित्तानं भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना तिसरा धक्का दिल्याचं बोललं जातंय.
दत्तात्रय भरणेंनी ठेवलेला सस्पेन्स
दत्तात्रय भरणे यांनी गेल्या सोमवारी फक्त श्रीमंत ढोले यांचेच नाव उघड केले होते. ढोले यांच्याबरोबरही अजूनही मोठे पक्षप्रवेश होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, विरोधकांना जरा मोठा झटका बसावा यामुळे आता मी काही पत्ते ओपन करणार नाही असेही भरणे यांनी सांगितले होते.
इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द या ठिकाणे होणार प्रवेश..
3 एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः शेंडे यांच्या गावी वरकुटे खुर्द या ठिकाणी जाणार असून त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. श्रीमंत ढोले व बापूराव शेंडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत, मात्र राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गळाला हे दोन बडे नेते लागल्याने राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे भाजपला खिंडार पाडण्यात यशस्वी झाले आहेत. यापक्ष प्रवेशा संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी बापुराव शेंडे यांना विचारले असता त्यांनी ही पक्ष प्रवेशासंदर्भात दुजोरा दिला आहे..
इतर बातम्या:
PBKS विरुद्ध RCB, IPL 2022 LIVE Score: राहुल चाहरने आरसीबीला दिला पहिला झटका
सांगलीत गोपीचंद पडळकरांनी डिजीटल गनिमी कावा नेमका कसा साधला? पाहा Video