कानून के हाथ बहूत लंबे होते है… वसंत मोरे यांची सूचक पोस्ट; मुलाच्या धमकी प्रकरणी एकाला अटक
वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी दिल्याच्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. मुंबईतून एकाला पुणे पोलिसांनी केली अटक आहे. हा संशयित आरोपी कोण आहे? त्याचा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध आहे का?
पुणे : पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकावल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या आरोपीला पुणे पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. वसंत मोरे यांच्या मुलाला व्हॉट्सअप मेसेज करून खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपीने कुणाच्या सांगण्यावरून ही धमकी दिली याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांनी कानून के हाथ बहोत लंबे होते है, अशी सूचक फेसबुक पोस्टही केली आहे.
वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी दिल्याच्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. मुंबईतून एकाला पुणे पोलिसांनी केली अटक आहे. हा संशयित आरोपी कोण आहे? त्याचा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध आहे का? किंवा त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याची माहिती घेण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं आहे. वसंत मोरेंच्या मुलाला 30 लाख रुपये खंडणी प्रकरणात धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून तपास सुरू आहे.
वसंत मोरे यांची पोस्ट
दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर वसंत मोरे यांनी सूचक ट्विट केलं आहे. तसेच पोलिसांचे आभारही मानले आहेत. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. कानून के हाथ बहुत लंबे होते है ! धन्यवाद… भारती विद्यापीठ पोलीस, असं वसंत मोरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. वसंत मोरे यांच्या या पोस्टवर मोरे समर्थकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सर्वांचा नाद करा, पण पुण्यात वसंत मोरे यांचा नाद करू नका, असा इशारा मोरे समर्थकांनी दिला आहे. काहींनी तर वसंत तात्या मोरे… बस नामही काफी है… असं म्हटलं आहे. तर काहींनी थेट वसंत मोरे हेच मनसेचे पहिले मुख्यमंत्री असतील असं म्हटलं आहे. काहींनी तर त्यांनी मनसेचे पहिले गृहमंत्री म्हटले आहे. मात्र, सर्वांनीच वसंत मोरे हे अत्यंत चांगले, मनमिळावू आणि समाजासाठी कार्य करणारे राजकारणी असल्याचं म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
दरम्यान, वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांना व्हॉट्सअपवर एक मेसेज आला होता. अल्पिया शेख या नावाने हा मेसेज आला होता. त्यात त्यांना 30 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. तुझ्या विवाहाचे बनावट सर्टिफिकेट करण्यात आले आहे. 30 लाख रुपये दे नाही तर या सर्टिफिकेटचा गैरवापर करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली होती. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.